क्लस्टरची अंतिम अधिसूचना
By admin | Published: July 7, 2017 06:29 AM2017-07-07T06:29:27+5:302017-07-07T06:29:27+5:30
ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणेकरांसाठी जीवनमरणाचा प्रश्न बनलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना अखेर लागू करण्यात आली असून धोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या ठाणेकरांना ३०० चौरस फुटांपर्यंत हक्काची आणि सुरक्षित घरे विनामूल्य मिळणार आहेत. मूळ योजनेत ही घरे भाडेतत्त्वावर देण्यात येणार होती. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सादर झालेल्या सुधारित योजनेनुसार आता ती मालकी हक्काने विनामूल्य देण्यात येणार आहेत.
उच्च न्यायालयाने नुकताच योजनेला हिरवा कंदिल दिल्यानंतर राज्य शासनाने गुरुवारी याबाबतची अंतिम अधिसूचना जारी केली. या योजनेसाठी शिवसेनेने दिलेला दशकभराचा लढा अखेरीस सफल झाला असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.जिल्ह्यातील शिवसेनेसह सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी क्लस्टर योजनेकरता दिलेल्या तीव्र लढ्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारने या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र, त्यात असंख्य त्रुटी होत्या, तसेच हा प्रश्न न्यायालयीन प्रक्रि येतही अडकला. त्यानंतर या योजनेतील त्रुटी दूर करुन पालिकेने सोशल इम्पॅक्ट असेसमेंट उच्च न्यायालयाला सादर केला.