क्लस्टर पुनर्विकास म्हणजे जमीनबळकाव मोहीम; मतदाता जागरण अभियानचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:14 AM2019-06-18T00:14:58+5:302019-06-18T00:15:03+5:30
प्रस्ताव नामंजूर करण्याची मागणी
ठाणे : महापालिकेने नव्याने क्लस्टर योजनेच्या अमंलबजावणीसाठी क्लस्टर इम्प्लिमेंटेशन युनिट स्थापन करून त्याअंतर्गत ४ गट स्थापन (लाभार्थी ठरविणे, एफएसआयची मोजणी करणे, सोयीसुविधा सर्वेक्षण, कायदेशीर बाबींची तपासणी) केले आहेत. यासाठीचा प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावरठेवला आहे. यावर ६.५ कोटींचा खर्च केला जाणार असल्याने या प्रस्तावास मंजुरी देऊ नये, अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाने लोकप्रतिनिधींकडे केली आहे. मुळात क्लस्टर पुनर्विकास म्हणजे जमीन बळकावण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महापालिकेने मोठा गाजावाजा करून क्लस्टर (समूह विकास योजना) योजना जाहीर झाली. परंतु, जनतेला विश्वासात न घेता व जबरदस्तीने ही योजना सोसायट्यांना स्वीकारण्यास भाग पाडण्याची स्थिती निर्माण करणे यात कोणाचा स्वार्थ आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. या योजनेस रेरा कायदा लागू नाही, त्यामुळे फसवणूक झाल्यास कोठे दाद मागणार?, ज्या सहकारी सोसायट्या मान्यता देतील, त्यांच्या मालकीची जमीन जाऊन त्याचा विकास लीज होल्ड जमिनीवर केला जाणार, अनेक सोसायटीचे कन्व्हेन्स झालेले नाही. त्यांनी डीम कन्व्हेन्स करून घेणे आवश्यक आहे.
सोसायटी कमिटीने याबाबत ठराव करून कार्यवाही सुरू करावी, पुनर्विकास करताना मूळ जागा मालकांना पर्यायी जागा देणे बंधनकारक करणे, जे रेरा कायद्याअंतर्गत आहे ते सक्तीचे करावे. तसेच जागा दिली नाही तर पर्यायी जागेचे भाडे व डिपॉझीट देणे विकासकावर बंधनकारक करावे, डेव्हलपमेंट करारात पेनेल्टी क्लॉज असला पाहिजे म्हणजे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास पेनेल्टी म्हणून दर महिन्याच्या भाड्याइतकी रक्कम गाळेधारकला देण्याची तरतूद हवी, तसेच स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाळी, लोकवस्त्या आणि अधिकृत तसेच अनाधिकृत इमारती पाडून क्लस्टर योजनेच्या नावाने त्या पुन्हा बांधायच्या मोठ्या जनसंख्येला लीजवर
म्हणजे भाड्याच्या घरात राहाण्यास भाग पडायचे या बदल्यात विकासकांनी प्रचंड नफा कमवायचा असाच काहीसा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अॅग्रीमेंट तपासून बघण्याचे आवाहन
क्लस्टर करिता केली जाणारी अॅग्रीमेंट तपासून बघा, समजले नाही तर समजून घ्या. प्रश्न घराचा आहे. चूक केलीत तर आयुष्यभर भोगावी लागेल. काळजी घ्या. मदत हवी असेल तर हाक मारा, असे आवाहन ठाणे मतदाता जागरण अभियानाचे वतीने करण्यात आले आहे.