क्लस्टर योजनेतून ठाण्यात २३ हजार अतिरिक्त घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:14 AM2018-02-20T01:14:02+5:302018-02-20T01:14:08+5:30
ठाणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध असून त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबवण्याचे प्रस्तावित केले
ठाणे : ठाणे शहरामध्ये सद्य:स्थितीत ५९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध असून त्यापैकी आजमितीस नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत १२९१ हेक्टर जमिनीमध्ये क्लस्टरची योजना राबवण्याचे प्रस्तावित केले असून यातून २३ हजार अतिरिक्त घरे निर्माण होणार असल्यामुळे परवडणाºया घरांच्या प्रमाणातही वाढ होणार आहे. यात मुख्य शहराबरोबरच कळवा, मुंब्रा, कौसा या उपनगरांचाही विकास होऊन रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार असल्याने ठाणेकरांचे राहणीमान उंचावणार असल्याचा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी व्यक्त केला.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीत कलस्टर योजनेचे सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर, ते बोलत होते. या योजनेमुळे ठाणे शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची आवश्यकता असून शहराच्या विकासासाठी कसलीही तडजोड न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी आयुक्तांना दिल्या. या बैठकीला शहर व विकास नियोजन अधिकारी, क्रि सिलचे सल्लागार, शहर नियोजनतज्ज्ञ संजय देशमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
शहराच्या एकूण तुलनेत २२ टक्के इतकी जमीन क्लस्टरअंतर्गत विकसित करण्यात येणार असून यामुळे ठाण्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा निर्माण होणार आहेत. यामध्ये क्र ीडा, सांस्कृतिक, सुरक्षितता, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचत गटांसाटी स्वतंत्र जागा, त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरवणारे कम्युनिटी सेंटर आदी विपुल प्रमाणात सुविधा निर्माण होणार आहेत. या सुनियोजित पुनरुत्थान योजनेमुळे एकूण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये जेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त संधी ठाणे शहरात निर्माण होणार आहे.