सीएम चषक देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 10:23 PM2018-12-02T22:23:13+5:302018-12-02T22:24:56+5:30
एनआरसी कंपनीच्या कामगारांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन
ठाणे: वीस लाख खेळाडूंनी नोंदणी केलेली सीएम चषक ही देशातील वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा असून ही नोंदणी 50 लाखांवर जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कल्याणजवळील मोहने येथे एनआरसी मैदानावर सीएम चषक जलयुक्त शिवार स्पर्धेच्या फुटबॉल अंतिम सामन्याचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
स्पर्धेतील विजय-पराजय महत्त्वाची नसून संघभावनेतून केलेला खेळ महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. खेळामुळे जीवनात खिलाडूवृत्ती निर्माण होते. सांघिक भावना वाढीस लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मंदिरापेक्षा तरुणांनी मैदानावर जावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कल्याण भागातील एनआरसीसारखी मोठी कंपनी अडचणीत आली आहे, कामगारांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर निश्चितपणे तोडगा काढून कामगारांचे संसार वाचविण्यात येतील तसेच रिंग रूटमध्ये ज्यांची घरे जात आहेत, त्यांचाही सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, उपमहापौर श्रीमती भोईर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त गोविंद बोडके उपस्थिती होते.