Maharashtra Karnataka Border Dispute: “याआधीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतलेली नाही”; CM एकनाथ शिंदेंनी सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 06:21 PM2022-12-15T18:21:48+5:302022-12-15T18:24:16+5:30
Maharashtra Karnataka Border Dispute: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पु्न्हा एकदा सीमावादासंदर्भात भाष्य करताना यापूर्वीच्या सरकारवर टीका केली आहे.
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावर भाष्य करताना आधीच्या सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीच्या सरकारने सीमावादावर कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी अप्रत्यक्ष टीका एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
एकनाथ शिंदे ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रथमच सीमावादप्रश्नावर हस्तक्षेप केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत नागरिकांना त्रास होऊ नये, मराठी बांधवांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका आम्ही आग्रहाने मांडली, याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच एवढे वर्ष कुणाचे सरकार होते. केंद्रात होते, राज्यात होते आणि कर्नाटकातही होते. असे असूनही तो निर्णय त्यांना घेता आलेला नाही. हस्तक्षेप करावा. न्यायाची बाजू मांडावी, अशी भूमिका घ्यावीशी वाटली नाही, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले.
सीमावादाचा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये
सीमावादा मुद्दा राजकीय मुद्दा करू नये. राजकारण सोडून मराठी जनतेसाठी उभे राहावे. आम्हाला सामंजस्याने यावर तोडगा काढायचा आहे. वाद वाढवायचा नाही. दोन्ही राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. एकाही नागरिकाला याचा त्रास होता कामा नये. आमचे विरोधकांनाही आवाहन आहे की, हा सामाजिक बांधिलकीचा प्रश्न आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्प असला तरी हे सरकार भूमिपुत्रांचे सरकार आहे. ज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथे लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावं अशी मागणी होती. पण प्रकल्पाचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याने अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी इकबाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. जास्तीचे पैसे खर्च झाले तरी चालतील. लेटेस्ट तंत्रज्ञान वापरावे लागले, मागवावे लागले तरी चालेल. पण स्थानिकांचे प्रश्न सोडवूनच पुढे जाता येईल अशी आमची भूमिका राहिली आहे. आता आम्ही कोस्टल रोडमधील दोन पिलरचे अंतर १२० मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन मच्छीमारांच्या बोटी सहजपणे समुद्रात ये-जा करु शकतील, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"