अपात्रता निकाल, उबाठा गट, घराणेशाही अन् आव्हान; शिंदेंचा आज पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:20 PM2024-01-11T16:20:52+5:302024-01-11T16:39:29+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन गटांकडून परस्परांविरोधात दाखल केलेल्य विविध याचिकांवर आपला निकाल सुनावत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षच मूळ शिवसेना असल्याचं सांगितलं. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषद घेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
कालच्या निर्णयानंतर अनेकांनी राज्यभर जल्लोष केला. सामान्य शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे. दीड वर्षापासून जो विश्वास माझ्यावर ठेवला त्यांचे आभार, असं एकनाथ शिंदे म्हणाले. लोकशाहीत बहुमताला महत्व असते आणि लोकसभा, विधानसभा आणि संघटनेत आम्हाला बहुमत आहे. त्यामुळे काल आमच्या बाजूने निकाल दिला. भरत गोगावले आमचे प्रतोद आहेत त्यावर देखील शिक्कामोर्तब झाला आहे. बाळासाहेबांचे विचार घेवून आम्ही सरकार स्थापन केले, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
भरत गोगावले यांची उबाठा गटाचे आमदार अपात्र करावे, ही याचिका अध्यक्षांनी फेटाळली याचे कारण आम्हाला माहिती नाही. विरोधी आमदारांच्या अपात्र संदर्भात आम्ही कायदेतज्ञांशी चर्चा करणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. उबाठा गटाकडे संघटनात्मक बहुमत आहे, अशा प्रकारचा कोणताही पुरावा ते देऊ शकले नाहीत. निवडणूक एका बरोबर लढवायची आणि निवडून आल्यावर सरकार दुसऱ्यासोबत स्थापन केले. बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेसचा विरोध केला, त्याच कॉंग्रेसच्या मांडीवर बसले, अशी टीका एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर केली.
विधानसभा अध्यक्षांबद्दल केलेले भाष्य खालच्या पातळींवरील आहे. स्वतःच मालक म्हणुन काहीही निर्णय घेता येणार नाही. उद्धव ठाकरे काल पत्रकारांवर उबाठा म्हटलं म्हणून संतापले. मात्र त्यांनी बाळासाहेबांच्याऐवजी स्वत:चे नाव पक्षासाठी मागितले. त्यामुळे त्यांना नेमकं काय पाहिजे हे समजले, असा निशाणा एकनाथ शिंदेंनी साधला. घराणेशाहीला ही चपराक आहे. जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा घटनेच्या आधारावर सर्व चालत होतं. नंतर मनमानी कारभार सुरु झाला, असा आरोपही एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. उद्धव ठाकरे उद्या कल्याण दौरा करणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यांनी त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचवावे, असं आव्हान देखील एकनाथ शिंदेंनी दिले.
एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद-
पत्रकारांशी संवाद..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 11, 2024
🗓️11-01-2024📍 ठाणे https://t.co/WdcwQj7gtR