अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

By अजित मांडके | Published: January 8, 2024 01:19 PM2024-01-08T13:19:00+5:302024-01-08T13:19:52+5:30

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होतानाचे मंगलकारी क्षण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्ष पाहणार.. अयोध्येला जाणार !!

cm eknath shinde has received an invitation for the dedication ceremony of shri ram temple in ayodhya | अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या मंगलकारी सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे निश्चित केले आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले. या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरविले आहे. 

अयोध्येतील श्रीराम मंदिराचा  लोकार्पण सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याच भावनेतून भारतीय जनता पक्षाचा जुना सहकारी आणि एनडीएमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.  

अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही १८ ते २२ जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी घरावर भगवे ध्वज, दारासमोर पणत्या, परिसरात भगव्या पताका, आणि मंदिरांना विद्युत रोषणाई करून हा क्षण मोठ्या प्रमाणात साजरा  करावा असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यासोबतच पक्षाच्या मुख्य नेत्याला या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. 

अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जावे अशी स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांनीही अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी ठाण्यातून चांदीची विट अयोध्येला पाठवली होती. रामजन्मभूमी आंदोलनात अनेक शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या साऱ्यांचे स्वप्न साकार होत असताना हा क्षण प्रत्यक्ष उपस्थित राहून याची देही याची डोळे पाहणे ही आपल्यासाठी परम भाग्याची गोष्ट असल्याने अयोध्येतील  या अभूतपूर्व सोहळ्याला आपण नक्की उपस्थित राहू असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले असून अयोध्येला येण्याचे मान्य केले आहे.

Web Title: cm eknath shinde has received an invitation for the dedication ceremony of shri ram temple in ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.