माझ्यातील एक गुण घ्यायचा असेल तर हा घ्या...; एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 01:09 PM2024-02-25T13:09:30+5:302024-02-25T13:12:47+5:30
यापूर्वी एवढा मोठा मेळावा कधी झाला नाही, कारण तेव्हा पक्षात एकच युवा आहे असा समज होता, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
Shivsena Eknath Shinde ( Marathi News ) : युवासेनेचा 'युवा महाराष्ट्र' हा राज्यस्तरीय मेळावा काल शनिवारी ठाण्यातील रेमंड मैदानात पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्की काय करायला हवे याबाबतची त्यांची भूमिका मांडली. तसंच माझ्यातील कोणता एक गुण तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्यातला कार्यकर्ता व्हा आणि कामाला लागा, असं आवाहन शिंदे यांनी उपस्थित युवासैनिकांना केलं.
युवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "दिवस रात्र एक करून मी लोकांसाठी काम करत असतो. मी केलेल्या कामाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही माझे 'एक्स' द्वारे कौतुक केले होते. मात्र माझ्यातील कोणता एक गुण तुम्हाला घ्यायचा असेल तर माझ्यातला कार्यकर्ता व्हा आणि कामाला लागा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, मुख्यमंत्री महारोजगार योजना, शासन आपल्या दारी यासारखे अनेक उपक्रम राबवल्यामुळे आपण थेट सर्वसामान्य लोकांशी जोडले गेलो आहोत. शासनाने दिवस रात्र एक करून अनेक निर्णय घेत असून हे निर्णय लोकांपर्यंत पोहचवावेत यासाठी आपण सर्वांनी स्वतः मुख्यमंत्रीच आहोत असे समजून काम करायला हवं. लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा," असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे.
आदित्य ठाकरेंना टोला
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. "युवासेनेचा एवढा भव्य मेळावा पहिल्यांदाच होत असून ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी एवढा मोठा मेळावा कधी झाला नाही कारण तेव्हा पक्षात एकच युवा आहे असा समज होता. मात्र आता हे चित्र बदलले आहे," असं ते म्हणाले. "वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार टिकावेत यासाठी दीड वर्षांपूर्वी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. मात्र गेल्या दीड वर्षात या सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असून ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवावेत," अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि चित्रकार शशिकांत धोत्रे यांना शिवसन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर शिवरायांचा छावा या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणरा अभिनेता भूषण पाटील याचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सत्यम लिंगोळे या तरुणाला युवासेना मध्यवर्ती कार्यालयात नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, दीपेश म्हात्रे, किरण साळी, अमेय घोले आणि राज्यभरातून आलेले युवासेना युवतीसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.