“शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले”; शिंदेंची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 10:22 AM2023-11-12T10:22:31+5:302023-11-12T10:24:45+5:30

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेप्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.

cm eknath shinde replied thackeray group chief uddhav thackeray over criticism about mumbra shakha issue | “शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले”; शिंदेंची ठाकरेंवर टीका

“शिवसैनिकांचे फटाके असे वाजले की काही फुसके बार न वाजताच निघून गेले”; शिंदेंची ठाकरेंवर टीका

CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: मुंब्रा शाखेवरून शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंब्रा येथे जाऊन शाखेची पाहणी केली. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गट तसेच राज्य सरकारवर सडकडून टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना खोचक शब्दांत टीका केली. 

बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली, पण खरा बुलडोझर घेऊन मी मुल्यातील रस्त्यावर आलो आहे. आपले बॅनर फाडल्याचे मला कळले. मात्र, निवडणुका येऊ द्या, मग दाखवतो, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिला. पोलिसांनी शाखाचोराचे रक्षण केले. प्रशासन हतबल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही विपरित घडले असते, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. पोलिस बाजूला करून भिडा, आमची तयारी आहे. या गद्दारांना येणाऱ्या सर्व निवडणुकांत पराभूत करा, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले.

काही फुसके बार न वाजताच निघून गेले

सध्या ठाण्यात दिवाळीपूर्वीच आतषबाजी सुरू झाली असून, शहरात काही फुसके बार आले होते जे न वाजताच निघून गेले. दुसरीकडे शिवसैनिकांचे फटाके असे काही वाजले की त्यांना माघार घ्यावी लागली, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केला. ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली शिवसेना शाखा आठवडाभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ताब्यात घेऊन जमीनदोस्त केल्याने या शाखेच्या जागेला भेट देण्याकरिता उद्धव ठाकरे दिवाळीत नेत्यांसह शिवसैनिकांचा फौजफाटा घेऊन मुंबईहून दाखल झाले. शिंदे गटाच्या कार्यकत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत 'कलानगर वापस चले जाओ', अशी घोषणाबाजी केली. यामुळे सुमारे तासभर मुंब्रा परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे दिवाळीत शिमगोत्सवाचे चित्र महाराष्ट्राने पाहिले.  

दरम्यान, महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दीपोत्सवाचे हे पर्व सर्वांच्या आयुष्यात मांगल्य आणि समृद्धी घेऊन येवो. सर्वांच्या आशा-आकांक्षा आणि संकल्प पूर्ण व्हावेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आपले सणदेखील तोच संदेश देतात. म्हणूनच स्वच्छतेचा कटाक्ष बाळगूया, प्रदूषण टाळूया. सणांचा आनंद घेताना पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारीसुद्धा सर्वांची आहे, हे लक्षात ठेवून सण साजरा करूया. शिवछत्रपतींचा, जिजाऊ माँसाहेब यांचा हा महाराष्ट्र केवळ देशातील अन्य राज्यांसाठी नव्हे, तर जगाने दखल घ्यावी अशी गौरवपूर्ण वाटचाल करीत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


 

Web Title: cm eknath shinde replied thackeray group chief uddhav thackeray over criticism about mumbra shakha issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.