दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 05:22 AM2024-10-06T05:22:09+5:302024-10-06T05:24:34+5:30

आमचे सरकार हे आता ‘लाडके सरकार’ झाले आहे. मात्र विरोधक केवळ टीका आणि आरोप करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

cm eknath shinde slams maha vikas aghadi in thane rally | दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मागील दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये विविध विकास कामे वेगाने सुरू आहेत. मात्र विरोधक केवळ टीका आणि आरोप करण्याचे काम करीत आहेत. आम्ही त्यांच्या टीकेला किंवा आरोपांना विकास कामांनी उत्तर देऊ. दुर्गादेवीच विरोधकांचा निवडणुकीत राजकीय संहार करील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केली.

ठाणे घोडबंदर येथील वालावलकर मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आम्ही कोविड काळात रुग्णांची खिचडी खाणारे  नाही, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे बंद केली. मात्र आमचे सरकार आले आणि विकास कामे वेगाने सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला. 

आमचे सरकार हे आता ‘लाडके सरकार’ झाले असल्याचेही ते म्हणाले. ठाणे जिल्हा हे विकासाचे खणखणीत नाणे असून २०३० पर्यंत ठाणे आर्थिक सुबत्तेत पुढे येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीने शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.

... तरच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोला! 

राहुल गांधी यांना आज छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येत आहे. मात्र पंडित नेहरू यांनी महाराजांचा अपमान करणारे पुस्तक लिहिले. आधी त्याबद्दल माफी मागा आणि मग महाराजांबाबत बोला, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आशियातील सर्वात मोठा भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अहंकार दुखावल्याने त्यांनी हे काम बंद केले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते वेगाने सुरू केले, असे फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्र योगदान देईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारत निर्माण करण्याच्या कामात महाराष्ट्र मोठे योगदान देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केला. 

 

Web Title: cm eknath shinde slams maha vikas aghadi in thane rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.