५० थरांनी राजकीय हंडी फोडली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 05:23 AM2022-08-20T05:23:52+5:302022-08-20T05:24:55+5:30
ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांच्या बहिणीने ही इच्छा बोलून दाखविली होती, अशी आठवण एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गोविंदा नऊ थर लावून हंडी फोडतात. मात्र, आम्ही ५० थर लावून दीड महिन्यापूर्वी सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. येत्या काळात हे थर आणखी वाढणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्याचा मुख्यमंत्री व्हावा, हे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांच्या बहिणीने ही इच्छा बोलून दाखविली होती. दिघे यांचा शिवसैनिक आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे यांनी टेंभी नाका येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळेचा गोविंदा जोरात आहे ना?, असा सवाल शिंदे यांनी गोविंदांना केला. शिंदे म्हणाले की, गोविंदांना माझ्या सरकारने विम्याचे संरक्षण दिले, साहसी खेळाचा दर्जा दिला आणि सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण दिले.
टेंभी नाका म्हणजे ‘गोविंदांची पंढरी’ आहे. आनंद दिघे यांनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असे दिघे यांचे स्वप्न होते. त्यांच्या बहिणीनेही हेच सांगितले होते. दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण केले. साथीचे आजार अजून गेलेले नाहीत. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गणपती उत्सव देखील उत्साहात साजरा झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार
शिंदे यांचे टेंभी नाक्यावर आगमन झाल्यानंतर त्यांनी थेट स्टेजवर न जाता, गोविंदा पथकांमधून वाट काढत, त्यांच्याशी संवाद साधत आनंद आश्रम येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ते स्टेजवर आले. यावेळी त्यांच्या समवेत खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के, योगेश जानकर, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद
- टेंभी नाक्यावरील दहीहंडीला प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. श्रद्धा कपूरने गोविंदांशी अस्खलित मराठीत संवाद साधला.
- टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मानाची हंडी असल्याचे सांगत, या उत्सवात बोलावल्याबद्दल मला अभिमान वाटत असल्याचे तिने सांगितले. आपल्या सोबत स्वत: मुख्यमंत्री शिंदे असल्याचा विशेष आनंद झाल्याचे तिने सांगितले.