एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवतील; गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला विश्वास
By अजित मांडके | Published: October 13, 2022 10:02 PM2022-10-13T22:02:41+5:302022-10-13T22:02:51+5:30
सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे.
ठाणे : महाराष्ट्र हे श्रमिकांच्या चळवळीसाठी अग्रेसर राहिलेले केंद्र आहे. परिणामी ठाण्याचे असलेले लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिकधिक पणे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि प्रवाश्यांच्या सोयीवर निधी देतील, असा विश्वास ऍड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक्त केला.
ठाण्यातील खोपट येथील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोत एसटी कष्टकरी जनसंघा या संघटनेच्या कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी ते गुरुवारी आले होते. नवीन बससाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या पत्नी ऍड जयश्री पाटील आणि त्यांची मुलगी झेन याही उपस्थित होत्या. यावेळी कष्टकरी जनसंघाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. ढोल ताशे आणि फटाके वाजवून सदावर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत करण्यात आले.
सदावर्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ११८ क्रांतिवीर कष्टकरी कामगारांना रुजू करण्यात आले आहे. तसेच कष्टकरी एसटी कामगारांचे पगार देखील तातडीने करण्यात आलेले आहेत. त्याच प्रमाणे आता दिवाळीच्या बोनस बाबत आम्ही आग्रह लावून ठेवलेला आहे. विलगीकरणाचा लढा आम्ही वेळोवेळी लावून धरणारचं आहोत. तसेच २०१९ मध्ये पास झालेल्या विध्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करून त्या बेरोजगार कष्टकऱ्यांना नोकरी देण्यात यावी हि आग्रहाची मागणी आम्ही राज्यसरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्ण प्रकाशमान करतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.