नोटीस बजावूनही राजन विचारे अन् केदार दिघे सोहळ्याला उपस्थित; मुख्यमंत्री म्हणाले, 'कारवाई करु नका'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 09:28 AM2022-08-15T09:28:25+5:302022-08-15T09:30:01+5:30
अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
ठाणे- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिंदे गटातील अनेक नेते पदाधिकारी उपस्थित होते.
ठाण्यातील सदर कार्यक्रमापूर्वी ठाकरे गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना नोटीस बजावली होती. मात्र यानंतरही राजन विचारे आणि केदार दिघे या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे काही वेळासाठी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सुदैवानं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली नाही.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न#स्वातंत्र्यदिन#IndiaAt75 #AzadiKaAmritMahotsavpic.twitter.com/xnwXLlncwc
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2022
ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. देशभक्तीची लाट नागरिकांमध्ये उत्पन्न झाली आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसेच आनंद दिघे यांनी ही ठाण्यात परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
राजन विचारे आणि केदार दिघे यांच्या उपस्थितीबाबतही पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. यावर ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचं आहे, त्यांना येऊ द्या. राजन विचारे यांच्या समवेत कोणावरही कारवाई करू नका, असं पोलिसांनी सांगितलं असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तसेच खात कोणतं आहे, या पेक्षा आपण न्याय कसा देतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी मंत्र्यांवर दिली आहे, ते नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देतील, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.