सीएम चषकाचा ठाण्यात फुसका बार; मुख्यमंत्र्यांना थेट मेसेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:17 AM2018-11-27T00:17:58+5:302018-11-27T00:18:07+5:30
खेळाडूंपेक्षा नेत्यांची गर्दी
ठाणे : कानाकोपऱ्यांतील खेळांडूना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सीएम चषकाचा बोलबाला सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्यातही या स्पर्धेस सुरुवात झाली आहे. परंतु, जिल्ह्यात या चषकाचा बार फुसका ठरला आहे. मोठा गाजावाजा करून घोडबंदर भागात रविवारी ही स्पर्धा आयोजिली होती. परंतु, तीत खेळाडूंपेक्षा नेते मंडळींचीच गर्दी अधिक दिसली. नियोजनाचा अभाव आणि मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी सोशल मीडियावर नेतेमंडळींनी केवळ चमकेगिरी केल्याचे यावेळी दिसले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळांडूना घडवण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सीएम चषकाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी पक्षाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यासाठी सुमारे ३५ लाखांची तरतूद केल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली.
सीएम चषकाचा शुभारंभ घोडबंदर भागातील श्री माँ स्कूलमध्ये रविवारी करण्यात आला. यावेळी ४०० आणि १०० मीटरच्या धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. परंतु, त्यातही खेळाडूंची संख्या नगण्यच दिसली. तसेच इतर १६ क्रीडा प्रकारांसह इतर स्पर्धांचा शुभारंभही यावेळी झाला. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, गायन, डान्स, व्हॉलिबॉल, रांगोळी आदींसह इतर स्पर्धांचा यामध्ये समावेश होता. परंतु, या स्पर्धांनासुद्धा खेळांडूनी अल्प प्रतिसाद दिल्याचे दिसले.
ज्या पद्धतीने सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून या चषकाचा बोलबाला केला होता, त्यानुसार मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात खेळाडूंच्या तुलनेत भाजपाचे नेतेच या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर असल्याचे दिसून आले. यावेळी शुभारंभाचे फोटोसेशनही चांगलेच रंगले. आता ते सोशल मीडिया आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवले जात आहे. परंतु, ज्या उद्देशासाठी या स्पर्धा आयोजिल्या होत्या, त्यालाच सपशेल हरताळ फासल्याचे दिसून आले. त्यामुळे नाराज झालेल्या काही पदाधिकाऱ्यांनी स्पर्धांच्या उद्देशालाच कसा हरताळ फासला जात आहे, हे मेसेजद्वारे थेट मुख्यमंत्र्यांनाच कळवले आहे.
नियोजनाचा अभाव
एखादी स्पर्धा यशस्वी करायची असेल, तर त्यासाठी वयोगट महत्त्वाचा मानला जातो. परंतु, येथे तर १६ वर्षे वयोगटातील खेळाडूंनाच संधी दिली होती. दुसरीकडे शाळा, महाविद्यालये, विविध प्रकारच्या क्रीडा संघटनांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. परंतु, तसे न झाल्याने सीएम चषकाचा बार फुसका ठरल्याचे भाजपा पदाधिकाºयांतच चर्चिले जात आहे.
आॅनलाइन अर्जांमुळे कमी प्रतिसाद मिळाला आहे. परंतु, विधानसभा क्षेत्रामध्ये काही स्पर्धा घेतल्या जाणार असल्याने त्यात्या विधानसभा क्षेत्रात जास्तीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. काही स्पर्धा एकत्रितपणे खेळवण्यात येणार आहेत.
- संदीप लेले,
ठाणे शहराध्यक्ष, भाजपा