अनधिकृत इमारती अधिकृत होणार?; मुख्यमंत्र्यांकडून मोठ्या निर्णयाचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 03:46 PM2020-02-06T15:46:37+5:302020-02-06T15:56:40+5:30
मुख्यमंत्र्यांचं ठाण्यात अनधिकृत इमारतींवर भाष्य
ठाणे : इमारती अनधिकृत आहेत. पण, त्यामध्ये राहणाऱ्या जिवंत माणसांची मतं अधिकृत आहेत. पण त्यांची मतं अधिकृत आहेत. त्या इमारतींमधल्या माणसांची मतं अधिकृत असतील, तर मग त्या इमारती अनधिकृत कशा, असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात उपस्थित केला.
ठाण्यातील किसननगर येथे देशातील पहिल्या नागरी समूह विकास योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल उपस्थित होते.
तीन विचारांचं सरकार देशाला एक दिशा दाखवतंय, त्याचा मला अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर भाष्य केलं. महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात देशाला दिशा दाखवतो. तसंच हे सरकार राष्ट्राला दिशा दाखवतं असून राजकारणाची दिशा ठरवत आहे. तसंच ठाण्यातला हा क्लस्टर प्रकल्प देशातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे मुंबई, ठाणेच नव्हे, तर देशाचंही लक्ष लागल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.