२७ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेबाबत सुनावणीनंतर निर्णय घेणार- एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 03:59 PM2020-03-11T15:59:57+5:302020-03-11T16:00:03+5:30
२७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते.
कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून वगळलेल्या २७ गावांचे नगर परिषदेत रूपांतर करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे आज आणि उद्या अशी दोन दिवस सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
सरकार याबाबतीत सकारात्मक असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. विधान परिषदेचे सदस्य जगन्नाथ शिंदे, हेमंत टकले, किरण पावसकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच बोलावलेल्या, सर्व संबंधितांच्या बैठकीतही यासंदर्भात चर्चा झाली. तेथेही उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, असेही ते म्हणाले.
या २७ गावांसंदर्भातील प्राप्त हरकती आणि सूचनाबाबत सुनावणी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले होते. यासंदर्भात ११ व १२ मार्च, म्हणजेच आज व उद्या सुनावणी सुरू असून या सुनावणी संदर्भात विभागीय आयुक्तांचा अहवाल मिळाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत तातडीने निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या २७ गावांसाठी नगरपरिषद गठित करण्यासाठी प्रारूप अधिसूचनेचा मसुदा ०७ सप्टेंबर २०१५ रोजीच प्रसिद्ध करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नागरी सुविधांच्या मुद्द्यावरून या सत्तावीस गावांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर या गावांचा विकास होत नसल्याने त्यासाठी येथे स्वतंत्र नगरपरिषद स्थापन केली जावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी स्थापन केलेल्या संघर्ष समितीने केली होती. या २७ गावांतील नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही नगरविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले