डोंबिवलीतील सीएनजी पंपाला नवीन वर्षातही मुहूर्त मिळेना !
By admin | Published: February 5, 2016 02:48 AM2016-02-05T02:48:09+5:302016-02-05T02:48:09+5:30
सीएनजी रिक्षा चालवण्याची सक्ती आरटीओने केलेली असली तरीही त्यासाठी लागणारा गॅसपुरवठा करणारा पंप डोंबिवलीत नाही. त्यामुळे एकूण पाच हजार परमिट रिक्षांपैकी
अनिकेत घमंडी, डोंबिवली
सीएनजी रिक्षा चालवण्याची सक्ती आरटीओने केलेली असली तरीही त्यासाठी लागणारा गॅसपुरवठा करणारा पंप डोंबिवलीत नाही. त्यामुळे एकूण पाच हजार परमिट रिक्षांपैकी गॅसवर चालवणाऱ्या चार हजारांहून अधिक रिक्षाचालकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. यासंदर्भात दोनवेळा आंदोलने होऊनही राजकारण्यांनी केवळ तारीख पे तारीख देत वाहनचालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. डिसेंबरअखेरीस ही सुविधा मिळेल, असे आश्वासन राजकारण्यांनी दिले होते. मात्र, तरीही त्यास मुहूर्त मिळत नसल्याचे स्पष्ट झाले.
शहरामध्ये गॅस सुविधा नसल्याने डोंबिवलीकरांना सध्या कल्याण, उल्हासनगरसह महापे येथे जावे लागत आहे. त्यामध्ये त्यांचा वेळ-गॅस व पैसा वाया जात आहे. येथील चित्ते पेट्रोलपंपावर ही सुविधा मिळणार असली तरी ती कधी, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी महानगर गॅस निगम यांच्याकडून जलद हालचाली करण्यात आल्या होत्या. आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचे काय झाले, असा संताप बहुतांश रिक्षाचालकांमध्ये आहे.
काही महिन्यांपूर्वीच महानगर गॅस निगमच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी परिसरातील सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
तेव्हा त्यांनी घरोघरी गॅसपुरवठा करण्यासह या ठिकाणी प्राधान्यक्रमाने पंप सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले होते. रहिवासी संकुलात जूनपर्यंत तर सप्टेंबरपर्यंत इतरांना गॅस सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता.
परंतु, प्रत्यक्षात काम झाले नसल्याचे स्पष्ट आहे. चित्ते पंपावर महिनाभरापूर्वी कामही करण्यात आल्याचे सांगण्यात आले.