संशयातून प्रशिक्षकानेच केली कबड्डीपटू मुलीची हत्या, प्रशिक्षक अटकेत
By अजित मांडके | Published: May 28, 2024 02:59 PM2024-05-28T14:59:25+5:302024-05-28T14:59:48+5:30
कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती.
ठाणे : आपली प्रियेसी दुसºयाबरोबर बोलते या संशयावरुन एका १७ वर्षीय कबड्डीपटू मुलीची तिच्याच प्रशिक्षकाने गळा आवळून आणि गळ्याभोवती कात्रीने भोसकून हत्या केल्याची घटना कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव (२३) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. कोलशेत येथे एका १७ वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा आवळून आणि कात्रीने गळ्याभोवती भोसकवून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर गणेश याचे त्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलशेत भागातील एका चाळीत ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. मृत १७ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होती.
२४ मे या दिवशी तिच्या घरातून अचानक दुगंर्धी सुटली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती घर मालकाला दिली. घर मालकाने दरवाजा उघडला असता, घरामध्ये १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यावेळेस तिची आई आणि भाऊ घरात नव्हते. त्यानंतर या संदर्भात कापुरबावडी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात नेला. शव विच्छेदन अहवाल २५ मे रोजी प्राप्त झाला, त्यात तिचा मृत्यू हा गळा दाबल्याने आणि गळ्या भोवती जखमा झाल्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कापूरबावडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तिच्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. त्यावेळी तिची ओळख कबड्डी प्रशिक्षक गणेश गंभीरराव याच्यासोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गणेश याला नवी मुंबईतील घणसोली येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने संशयातून तिची हत्या केल्याची कबूली दिली. सोमवारी याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली.
या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, मृत मुलीला कबड्डी खेळण्याची आवड होती. तिने गणेश याच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. यातून त्यांची मैत्री झाली होती. गणेश तिच्यावर प्रेम करत होता. २३ मे या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी घरामध्ये एकटी असताना गणेश तिच्या घरी आला. ती इतर कोणाशी तरी मोबाईलवर बोलत असते असा संशय गणेश याला होता. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला. त्यानंतर तिच्या गळ्या भोवती कात्रीने जखमा केल्या. हत्या झाल्यानंतर गणेशने बाहेरून दरवाजा ओढून पळ काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गणेश याला अटक करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.