९० टक्के कंपन्या बॉयलरसाठी वापरतात कोळसा

By Admin | Published: January 4, 2016 01:54 AM2016-01-04T01:54:07+5:302016-01-04T01:54:07+5:30

उद्योगांना परवानगी देताना प्रदूषण टाळण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बायोमास ब्रिकेट इंधनाचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली असतानाही

Coal companies use 90% of the boiler for boilers | ९० टक्के कंपन्या बॉयलरसाठी वापरतात कोळसा

९० टक्के कंपन्या बॉयलरसाठी वापरतात कोळसा

googlenewsNext

मुरलीधर भवार,  कल्याण
उद्योगांना परवानगी देताना प्रदूषण टाळण्याकरिता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून बायोमास ब्रिकेट इंधनाचा वापर करण्याची सक्ती करण्यात आली असतानाही ९० टक्क्यांपेक्षा जास्त कंपन्या ही सक्ती धाब्यावर बसवून दगडी कोळशाचा वापर करीत आहेत. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी त्यात भर पडत आहे. कंपन्या स्वस्त इंधन खरेदीच्या सोसापायी माणसाच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
या विषयाचा अभ्यास असलेले डोंबिवलीतील अभ्यासक चंद्रहास पाटील यांनी सांगितले की, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच बड्या कंपन्या बायोमास ब्रिकेटचा वापर इंधनासाठी करीत आहेत. जवळपास ९० टक्के कंपन्यांच्या बॉयलरकरिता दगडी कोळसा, फर्नेस आॅइल, डिझेल यांचा वापर केला जातो. त्यातून कार्बन मोनॉक्साइड व सल्फरडाय आॅक्साइड वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडले जाते. कोळसा जाळल्याने ग्रीन हाऊस इफेक्ट वाढीस लागला आहे. त्यामुळे पर्यावरणाला जास्त धोका निर्माण झाला आहे.
केमिकल्स व औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांत पाण्याची वाफ करण्यासाठी बॉयलरची आवश्यकता असते. ९० टक्के कंपन्यांत बॉयरल असतोच. त्याचा रासायनिक प्रक्रियेसाठी उपयोग केला जातो. स्वस्त इंधन वापरून पैसे वाचवायचे आणि उत्पादनातून बक्कळ पैसा कमवायचा, या नफेखोरी प्रवृत्तीमुळे बॉयलरसाठी सगळ्यात जास्त प्राधान्य दगडी कोळशाला दिले जाते. त्यानंतर, फर्नेस आॅइल आणि डिझेलला ते दिले जाते. डोंबिवलीतील कारखान्यांतून कोळशाचा वापर होत असल्याने औद्योगिक निवासी परिसरातील घरांचे छत काळे होणे, गच्चीवर काजळी व राखेचा थर दिसून येणे, हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. नागरिकांनी याविषयी वारंवार तक्रारी करूनही त्याचा काही उपयोग होत नाही.
दगडी कोळशात भारतीय दगडी कोळसा, इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलियन कोळसा असे तीन प्रकार आहेत. या कोळशाची किंमत एक किलोला साडेचार रुपये इतकी आहे. कंपन्यांना टनाच्या प्रमाणात कोळसा लागतो. तो स्वस्त मिळत असल्याने त्याचा वापर जास्त केला जातो. फर्नेस आॅइल बाजारात ४५ रुपये दराने मिळत होते. आता त्याची किमत घसरली आहे. २५ रुपये झाली आहे. त्यामुळे फर्नेस आॅइलचा वापरही कोळशानंतरचा दुसरा पर्याय आहे. आता चंद्रपूरच्या खाणीतला कोळसा संपुष्टात येत आहे. सध्या बिहार आणि आसाममधून कोळसा येत आहे. हे दीर्घकाळ पुरणारे इंधन नाही. त्याला पर्यायी इंधन अ‍ॅग्रो वेस्टपासून तयार झालेले बायोमास ब्रिकेट आहे. बायोमास ब्रिकेटची बाजारात किलोला साडेपाच रुपये किंमत आहे. त्याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड व सल्फरडाय आॅक्साइड शून्य प्रमाणात निर्माण होतो. पर्यावरणासाठी बायोमास ब्रिकेट किती उपयुक्त आणि फायदेशीर आहे, हे महत्त्वाचे आहे. बायोमास ब्रिकेट तयार करून पुरवठा करणाऱ्या कंपन्या अथवा ते उत्पादन करणारे तरुण जवळपास १०० च्या संख्येत आहेत. ते दिवसाला १०० ते ३०० टन ब्रिकेट पुरविण्याची क्षमता ठेवून आहेत. मात्र, त्यांच्याकडे आॅर्डरच नसल्याने त्यांच्या भवितव्यासह पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. कोळशाचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा प्रदूषण नियंत्रण मंडळाने उगारण्याची गरज आहे.

Web Title: Coal companies use 90% of the boiler for boilers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.