व्यवहार्य बोलाल तरच युती

By admin | Published: January 26, 2017 03:17 AM2017-01-26T03:17:15+5:302017-01-26T03:17:15+5:30

युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे

The coalition will only call it viable | व्यवहार्य बोलाल तरच युती

व्यवहार्य बोलाल तरच युती

Next

ठाणे : युतीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. परंतु, पालिकेतील शिवसेनेचे ७५ हे संख्याबळ पाहता ती व्यवहार्य असावी, असे मत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. परंतु, युतीबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी युतीबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ६५ नगरसेवक असून शिवसेनेवर विश्वास टाकणारे, शिवसेनेच्या कामावर विश्वास टाकणारे असे मिळून आमच्याकडे ७५ चे संख्याबळ आता आहे. त्यामुळे या संख्याबळानुसार युतीची बोलणी व्हावी. परंतु, भाजपाकडून व्यावहारिक पातळीवर बोलणी झाली, तरच युतीला महत्त्व असणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेनेच्या वचननाम्यावर भाष्य करताना प्रशासनाने केलेली कामे आपण केली आहेत, असा दावा शिवसेनेने केला असल्याकडे शिंदे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ज्यांना उमेदवार शोधण्यासाठी वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागते, त्यांच्याकडून अशा प्रकारचा आरोप होणे, हे हास्यापद आहे. ज्या महापालिकेत ज्यांची सत्ता असते, त्या सत्ताधाऱ्यांनी सुचवलेली कामे प्रशासनाकडून होत असतात. त्यानुसारच महासभेत ठराव होत असतात. त्यामुळे प्रशासनाकडून काम करवून घेण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये असावी लागते. ती धमक शिवसेनेने दाखवली, म्हणूनच आज ठाण्यासाठी विविध विकासकामे होऊ घातली असल्याचे त्यांनी राणे यांना सुनावले.
ठाणेकरांना पारसिक येथे मोठी चौपाटी मिळणार असून ते ठाणेकरांचे आकर्षण असेल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी जर तुम्हाला चौपाटी करायची होती, तर जेव्हा तुम्ही मंत्री होतात, सत्तेत होतात आणि १० वर्षे त्या मतदारसंघाचे आमदार होतात, तेव्हा ती करता आली नाही का, असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लगावला. सेंट्रल पार्क, धरणाचा विषय मागील कित्येक वर्षे पडून होता. परंतु, आम्ही केवळ दोन वर्षांत याला चालना दिली. शिवसेना दुसऱ्यांचे श्रेय कधीच घेत नाही. जे आम्ही केले, तेच जाहीर केल्याचेही या वेळी शिंदे म्हणाले. आम्ही शरद पवार यांचा नेहमी आदर केला आहे, परंतु आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे लहान झाले नाहीत तर आव्हाडांची लायकी काय आहे, ते जनतेला दिसले आहे, असेही ते बोलले. केवळ त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्यानेच अशा प्रकारे त्यांच्याकडून आरोप केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)

Web Title: The coalition will only call it viable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.