तटरक्षक दलातर्फे समुद्रकिनारा स्वच्छता दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:39 PM2019-09-21T23:39:37+5:302019-09-21T23:39:41+5:30
डहाणूत झाला कार्यक्रम; शालेय विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग
डहाणू/बोर्डी : जागतिक समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी सकाळी पारनाका किनाऱ्यावर भारतीय तटरक्षक दलातर्फे कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थी, नागरिक, प्रशासनाचे विविध विभाग, डहाणू नगरपरिषद, एसीजी कॅप्सूल, अदानी थर्मल पॉवर स्टेशन आदींनी सहभाग घेतल्याची माहिती कमांडंट संतोष बी.नायर यांनी दिली.
या दलातर्फे भारतात २००५ आणि २०१२ पासून डहाणूतील विविध किनाऱ्यांवर ही मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत त्याची अमलबजावणी करताना समुद्रपर्यावरण, पर्यटन, मासेमारी आदींसाठी मिळणारे योगदान या विषयीची माहिती असिस्टंट कमांडंट नेहा राजू बारंगे यांनी दिली.
या वेळी के.एल.पोंदा हायस्कूल, अ.ज.म्हात्रे या विद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांना खास या मोहिमेकरिता तयार केलेले पांढरे टी शर्ट, टोपी आणि ग्लोज देऊन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. प्लास्टिक, पॉलिथीन, टाकाऊ बाटल्या असा सुमारे तीन टन कचरा गोळा केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली.
पावसाचा पूर आणि लाटांनी किनाºयावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा येतो. त्याच्या स्वच्छतेकरिता या दलातर्फे राबवली जाणारी ही मोहीम कौतुकास्पद असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश केल्याने अभियानाला बळकटी आली आहे.
- सौरभ कटीयार, सहायक जिल्हाधिकारी, डहाणू
या दलातर्फे झालेल्या स्वच्छता कार्यक्र मात शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी केल्याने या भावी नागरिकांना स्वच्छता, पर्यावरण आणि मानवी आरोग्य याविषयी जाणीव होण्यास मदत होईल. आमच्या शाळेकडून त्याला नेहमी सहकार्य मिळेल. - रवींद्र बागे, उपमुख्याध्यापक, पोंदा हायस्कूल