आचारसंहिता संपताच ‘सभां’ चा सपाटा!
By Admin | Published: February 15, 2017 04:33 AM2017-02-15T04:33:22+5:302017-02-15T04:33:22+5:30
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत
कल्याण : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच कल्याण-डोंबिवली महापालिकेत महासभा, परिवहन, स्थायी समिती आणि शिक्षण समिती अशा एकापाठोपाठ सात सभांचे नियोजन आठवडाभरात करण्यात आले आहे. बुधवार, १५ फेब्रुवारीला तर एकाच दिवशी त्यातील पाच सभा होणार आहेत.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे मागील महिन्यात एकही सभा झाली नाही. ६ जानेवारीची परिवहनच्या अंदाजपत्रकाची सभाही आचारसंहितेमुळे घेता आलेली नाही. ती सभा आता बुधवारी सक ाळी १० वाजता होईल. त्यात परिवहनचे अंदाजपत्रक सादर होणार आहे. यानंतर, लगेचच सकाळी ११ वाजता कर दरसादरीकरणाची सभा, तर ११.३० वाजता स्थायी समितीची सभा होईल. याच दिवशी दुपारी २ वाजता परिवहनच्या निवडणुकीनिमित्त बोलवलेली महासभाही होईल. दुपारी ४ वाजता परिवहन समितीची सभा होणार आहे. त्यानंतर, १८ फेब्रुवारीला शनिवारी सकाळी ११.३० वाजता शिक्षण समितीची सभा होईल. तर, २० फेब्रुवारीला सोमवारी सकाळी ११ वाजता महासभा होणार आहे.
आज अधिकृत घोषणा
परिवहन समितीतील सहा सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार होती. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी म्हणजेच ७ फेब्रुवारीला कोणत्याच पक्षाने अर्ज दाखल न केल्याने ही निवडणूक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी दुपारी २ वाजता या निवडणुकीसाठी विशेष महासभा आयोजित करण्यात आली होती. परंतु, अर्जच न आल्याने निवडणूक होणार नसलीतरी या सभेत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. तसेच महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी या निवडणुकीतील गुप्त मतदान प्रक्रियेला घेतलेली हरकत पाहता पुढील निवडणूक कशाप्रकारे घेतली जाईल, याचीही माहिती या सभेत देण्याची दाट शक्यता आहे.
(प्रतिनिधी)