आचारसंहिता संपली, आता रस्तेदुरुस्ती करा; मनसे आमदार केडीएसी आयुक्तांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:12 AM2019-11-02T00:12:18+5:302019-11-02T00:12:51+5:30

प्रमोद पाटील : केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्यासोबत केली विविध समस्यांवर चर्चा

The code of conduct is gone, now fix the road; MNS MLAs meet Commissioner | आचारसंहिता संपली, आता रस्तेदुरुस्ती करा; मनसे आमदार केडीएसी आयुक्तांच्या भेटीला

आचारसंहिता संपली, आता रस्तेदुरुस्ती करा; मनसे आमदार केडीएसी आयुक्तांच्या भेटीला

googlenewsNext

कल्याण : पावसाळा आणि आचारसंहिता संपली आहे. आता कल्याण-डोंबिवली शहरांतील समस्यांवर लक्ष केंद्रित करा. खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम तातडीने हाती घेऊ न शहर खड्डेमुक्त करण्याची मागणी मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या भेटीत केली आहे. यावेळी समस्या सोडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी बोडके यांनी त्यांना माहिती दिली.

केडीएमसीच्या हद्दीतील फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. आयुक्त गुरुवारी स्वत: रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर फेरीवाल्यांवरील कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे, अशी अपेक्षा आ. पाटील यांनी व्यक्त केली. स्टेशन परिसरात १५० मीटरच्या हद्दीत फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर, शाळा-कॉलेजांच्या १०० मीटर परिसराबाहेर फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी आहे. हाही नियम पाळला जात नाही. याविरोधात मनसेवर आंदोलन करण्याची वेळ आणू नका, असा इशारा देतानाच मनसेने याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

फेरीवाल्यांप्रमाणेच शहरातील प्रमुख चौकांत आणि विशेषत: कल्याण-डोंबिवली स्टेशन परिसरात बेकायदा रिक्षास्टॅण्डने जागा अडवलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होते. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौक रिक्षास्टॅण्डनी वेढलेला आहे. वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या मदतीने ही समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी पुढाकार घ्यावा, असेही पाटील यांनी सूचित केले. डोंबिवलीतील कोपर दिशेकडील पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. त्याचे पुढे काय झाले? २७ गावांत पाणीपुरवठ्याची समस्या आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. २७ गावांतील लोकांना शॉवरखाली अंघोळ करण्यासाठी पाणी लागत नाही तर पिण्यासाठी हवे आहे. पिण्यापुरते पाणी मिळावे अशी माफक आपेक्षा त्यांनी व्यक्त केली. २७ गावांतील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्ते नीट केले जावेत. २७ गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यावर ग्रामपंचायतीचे कर्मचारी महापालिकेने घेतले. मात्र त्यांना किमान वेतन दिले जात आहे. त्यांना महापालिकेच्या सेवेत समावून घेतले जावे, अशीही त्यांनी मागणी केली.

आयुक्त बोडके म्हणाले की, फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाईत सातत्य ठेवले जाणार आहे. महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले आहे. त्यांना फेरीचा व्यवसाय करण्यासाठी पट्टे मारून जागा ठरवून दिली आहे. त्यांची पुन्हा तपासणी केली असता ते फेरीवाले मिळून आले नाहीत. सर्वेक्षणानुसार जागावाटप केले जाईल. त्याव्यतिरिक्त व्यवयास करणाºया फेरीवाल्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. बेकायदा रिक्षास्टॅण्ड प्रकरणीही आरटीओ आणि वाहतूक शाखेशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाईल. डोंबिवलीतील कोपर दिशेकडील पुलाचे डिझाइन रेल्वेला सादर करण्यात आलेले आहे. २७ गावांसाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून १९२ कोटी खर्चाची पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी योजना मंजूर केली आहे. तिचे काम सुरू झालेले आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण होईल. २७ गावांतील कामगारांचा विषय महापालिकेच्या आकृतिबंधात समाविष्ट केला आहे. महासभेत आकृतिबंधाला मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी सरकार दरबारी पाठवला आहे. सरकारच्या मान्यतेशिवाय हा विषय मार्गी लावता येणार नाही.

पाटील यांनी आमदार पदाची शपथ घेण्यापूर्वीच गुरुवारी टोरंट कंपनीविरोधात मोर्चा काढला. शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीतील समस्यांप्रकरणी आयुक्तांशी चर्चा केली. त्यामुळे पाटील हे कामाला लागले आहेत. आयुक्तांच्या भेटीवेळी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, डोंबिवलीचे पदाधिकारी राहुल कामत, मनोज घरत, सागर जेधे, महिला आघाडीच्या मंदा पाटील, ऊर्मिला तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: The code of conduct is gone, now fix the road; MNS MLAs meet Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.