निकीता देशमुख यांनी साकारली कॉफी पेटिंग्स्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 08:45 PM2018-02-17T20:45:33+5:302018-02-17T20:45:33+5:30
डोंबिवली- निकिता देशमुख यांनी चित्रकलेची साधना करताना माध्यम म्हणून रंगांच्या ऐवजी कॉफीची चित्रे रेखाटली आणि त्यातूनच कॉफी पेटिंग्ज कॅनव्हॉसवर उतरली. अशा कॉफी पेटिंग्जचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हे प्रदर्शन १८ फेबु्रवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. डोंबिवलीत पहिल्यांदाच कॉफी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई, पुणे बडोदा, इंदौर याठिकाणी प्रदर्शन भरविली होती. पुढच्या आठवड्यात गोव्यात हे प्रदर्शन होणार आहे. निकिता यांच्याकडे कॉफीमधील ५० पेटींग्ज तयार आहेत. त्यापैकी २० चित्रे प्रदर्शनात मांडली आहेत. रंग सोडून अजून कोणत्या माध्यमांचा वापर करता येईल हा विचार करताना कॉफीचा वापर करण्याची संकल्पना सुचली. निकीताला कॉफी खूप आवडत असल्याने तिने कॉफीचा वापर चित्रकलेत करण्याचा विचार केला. लॅड स्केप डिझाइन शिकत असताना रंग, रूप, आकार यांची ओळख झाली आणि हेच क्षेत्र आपल्यासाठी योग्य असल्याचे जाणवले. पण नेहमीच्या तेलचित्र किंवा अकरॅलीक रंग वापरण्याऐवजी काहीतरी वेगळं माध्यम निवडावं असा विचार मनात आला. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता एक गती घेताना दिसत आहे. कॉफी हा खादयपदार्थ असल्याने ही चित्रे खराब होण्याची शक्यता होती. चित्रांमध्ये रंगाऐवजी कॉफी वापरण्यास सुरूवात केली. तेव्हा ही चित्रे टिकून कशी राहतील हा प्रश्न होता. त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करीत होते. हार्डनेर आणि रिझमच्या मिश्रणाचा एक थर चित्रांवर लावण्यास सुरूवात केली. हा प्रयोग यशस्वी झाल्याचे निकिता सांगते . या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ओमकार इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात गणपती बाप्पा, शंकर पार्वती, विठोबा, गार्डनमधील स्त्री, निसर्ग, भौतिकशास्त्रातील काही आकृती पाहायला मिळत आहे.