खासगी रुग्णालयांचा लसीकरणास थंड प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 02:20 AM2021-03-06T02:20:12+5:302021-03-06T02:20:18+5:30

ठाण्यात केवळ दोन रुग्णालयांत झाले सुरू : लसीची किंमत नियंत्रित केल्याचा परिणाम?

Cold response to private hospital vaccinations | खासगी रुग्णालयांचा लसीकरणास थंड प्रतिसाद

खासगी रुग्णालयांचा लसीकरणास थंड प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे  : ठाणे महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयातील लसीकरणाने अद्याप म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. जवळपास पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ठाण्यातील दोन खासगी रूग्णालयांमधील लसीकरणाला शुक्रवारी प्रारंभ झाला. अद्याप सात खासगी रुग्णालयांमधील लसीकरण सुरू व्हायचे आहे. केंद्र सरकारने लसीची किंमत नियंत्रित केल्याने खासगी रूग्णालये लसीकरणास फारशी उत्सुक नसल्याची चर्चा आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक व विविध आजारांनी त्रस्त असलेल्यांचा लसीकरणाकरिता खोळंबा होऊ नये याकरिता महापालिकेनी आपल्या लसीकरण केंद्राची संख्या ३० केली आहे. त्याचबरोबर घराजवळ लोकांचे लसीकरण व्हावे याकरिता डिजी ठाणे प्लॅटफॉर्ममार्फत एका क्लिकवर लसीकरण होण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.


खासगी रुग्णालयात लसीकरण करायचे असल्यास त्याकरिता केंद्र सरकारची परवानगी लागते. त्याकरिता त्या रुग्णालयाने त्यांना किती डोस हवेत त्यानुसार लसीची रक्कम आगाऊ भरणे गरजेचे आहे. असे पैसे भरल्याची पावती महापालिकेस दाखविल्यावर त्यांना लसीचे डोस दिले जातात. 
केंद्र सरकारने लसीकरण सर्वसामान्यांना परवडावे याकरिता त्याचे दर निश्चित केल्याने खासगी रुग्णालयांना या मोहिमेत लक्षणीय नफा दिसत नसल्याने काही खासगी रुग्णालय बळेबळे या मोहिमेत सहभागी होत असल्याचे बोलले जात आहे. 


ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून १ मार्चपासून दुसऱ्या टप्प्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानुसार पहिल्या दिवशी १५ केंद्रावर हे लसीकरण सुरू होते. खासगी रुग्णालयांमधील लसीकरण कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणानंतर सुरू होईल, असे सांगितले जात होते.  प्रत्यक्षात आतापर्यंत ठाण्यातील केवळ दोन खाजगी रुग्णालये शुक्रवारपासून लसीकरण करणार आहेत. यामध्ये ज्युपिटर आणि न्यू हॉराईझन प्राइम या रुग्णालयांचा समावेश आहे. उर्वरित सात खाजगी रुग्णालये लवकरच लसीकरण सुरू करतील, असे महापालिकेने स्पष्ट केले. 
मात्र खासगी रुग्णालयांचा थंड प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिकेने आपल्या लसीकरण केंद्रांची संख्या शुक्रवारी दुप्पट करून ३० केली.  आतापर्यंत ३६ हजार हेल्थ वर्कर आणि फ्रंटलाइन वर्करला लस देण्यात 
आली आहे. 

लसीकरण केंद्रांची माहिती एका क्लिकवर
महापालिकेच्या लसीकरण केंद्रांची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आता पालिकेने डिजी ठाणेच्या माध्यमातून एका क्लिकवर आपल्या नजीकचे केंद्र कुठे आहे, याची माहिती उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे. यासाठी प्रत्येक केंद्राची लिंक देण्यात 
आली असून या लिंकच्या माध्यमातून तुम्ही कुठे राहता, याची माहिती त्या ठिकाणी दिल्यास तुमच्यापासून जवळच्या अंतरावर केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळणार आहे.

ऑफलाइन 
६० टक्के रजिस्ट्रेशन
लसीकरणाकरिता ऑनलाइन नोंदणी करतांना अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाइन रजिस्ट्रेशन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. या पद्धतीतही अडचणी असल्याचे दिसून येत आहे. ऑफलाइनमध्ये एकाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी १० मिनिटांचा कालावधी जात आहे. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होताना दिसत आहे. असे असले तरी ६० टक्के नोंदणी ही ऑफलाइन तर ४० टक्के नोंदणी ही ऑनलाइन होत आहे.

१० केंद्रे एक 
दिवसाआड राहणार सुरू
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या २५ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. त्यातील १५ केंद्रावर रोजच्या रोज लसीकरण केले जात आहे. परंतु उर्वरित १० केंद्रावर एक दिवसाआड लसीकरण केले जात आहे. ही १० आरोग्य केंद्रे छोटी असल्याने त्याठिकाणी इतर दिवशी गरोदर मातांची तपासणी, कधी लहान मुलांचे लसीकरण असल्याने गर्दी वाढण्याचा धोका असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये ढोकाळी, बाळकुम, शिळ, वर्तकनगर, उथळसर, आतकोनेश्वर नगर, नौपाडा, काजूवाडी, कोपरी आणि सावरकरनगर केंद्राचा समावेश आहे.

१ ते ४ मार्चपर्यंत ४५ ते ६० वयोगटातील ६१५ तर ६० वयोगटापुढील ३६०० ज्येष्ठांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. 
गुरुवारी एका दिवशी २९९४ जणांना लस देण्यात आली. शहरात येत्या काही दिवसात आणखी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस पालिकेने व्यक्त केला आहे.

Web Title: Cold response to private hospital vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.