डोंबिवलीत गणेशोत्सवात ४० टन निर्माल्याचे संकलन; निर्मल युथ फाउंडेशनची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:09 AM2019-09-14T00:09:22+5:302019-09-14T00:09:29+5:30
प्लास्टिक आणि घनकचऱ्याचेही केले वर्गीकरण, निर्माल्यापासून बनवणार खत
डोंबिवली : गणेशोत्सवात होणाºया जलप्रदूषणाला आळा बसावा, यासाठी शहरातील निर्मल युथ फाउंडेशनने पुढाकार घेतला. गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य, सजावटीचे साहित्य व घनकचरा जलाशयांमध्ये जाऊ नये, यासाठी फाउंडेशनने सर्व विसर्जनांच्या दिवशी निर्माल्य संकलित केले. त्यानुसार, विविध ठिकाणांहून एकूण ४० टन २६० किलो निर्माल्य, २० टन १९५ किलो प्लास्टिक आणि १२ टन घनकचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, निर्माल्यापासून श्री गणेश मंदिराच्या गांडूळखत प्रकल्पात खतनिर्मिती केली जाणार आहे.
वाहत्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. परंतु, डोंबिवली शहर व त्यालगतच्या ग्रामीण भागांमध्ये विहिरी, तलाव आणि खाडीकिनारी विसर्जन सोहळा पार पडतो. यावेळी गणेशमूर्तींबरोबर निर्माल्य आणि सजावटीचे साहित्य पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण वाढते. शिवाय, जलचरांचा अधिवास आणि जैवविविधता धोक्यात येण्याची भीती असते. त्यामुळे विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता ते कार्यकर्त्यांकडे द्यावे, असे आवाहन फाउंडेशनने केले होते.
गणेशोत्सवात दीड ते ११ दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी पूर्वेतील आयरेगाव तलाव तर, पश्चिमेतील कोपर तलाव, जुनी डोंबिवली गणेशघाट, रेतीबंदर गणेशघाट, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा येथे फाउंडेशनने विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांच्या ३५० हून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने निर्माल्य संकलित केले.
साउथ इंडियन असोसिएशन आणि प्रगती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाचे स्वयंसेवक, जी.आर. पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी, पर्यावरण दक्षता मंडळ संस्थेच्या रूपाली शाईवाले, केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी विलास जोशी, पूर्व विभागाचे स्वच्छता निरीक्षक अधिकारी विलास गायकवाड, पश्चिम विभागाचे राजेंद्र खैरे आदींचे सहकार्य त्यासाठी मिळाले, असे फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.