कलेक्शन करणे हे केडीएमसीच्या अतिक्रमण हटाव पथकाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 04:46 PM2018-02-22T16:46:57+5:302018-02-22T16:50:24+5:30
न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे काम करते. त्यामुळे तुटपुंजी कारवाई हा केवळ दिखावा असून त्यात अधिका-यांसह सगळयांचच चांगभल होत असल्याची टीका फ प्रभागसमितीच्या बैठकीत नगसेवकांनी केली.
डोंबिवली: न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवणा-या कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये विशेषत: डोंबिवली पूर्वेला, ठाकुर्ली स्थानक परिसरासह जागा मिळेल तिथे फेरिवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्याला फ प्रभाग अधिका-यांचे अभय असून महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक हे केवळ ‘कलेक्शन’चे काम करते. त्यामुळे तुटपुंजी कारवाई हा केवळ दिखावा असून त्यात अधिका-यांसह सगळयांचच चांगभल होत असल्याची टीका फ प्रभागसमितीच्या बैठकीत नगसेवकांनी केली.
गुरुवारी महापालिकेच्या उपइमारतीमध्ये घेण्यात आलेल्या सभेमध्ये फेरिवाला प्रश्नासंदर्भात ठाकुर्लीच्या नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी सपशेल नाराजी व्यक्त करत यासंदर्भात प्रभागक्षेत्र अधिकारी अमित पंडित हे जबाबदार असून ते कार्यक्षम नसल्याचे म्हंटले. ठाकुर्लीमधील संतवाडी परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील असतांनाच आता फेरीवाले बसतात त्यामुळे त्यात भर पडत असून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतो. ते नगरसेविकेला जाब विचारतात, त्यामुळे महापालिकेच्या नाकर्तेपणाचा फटका आम्हाला बसत असल्याची टिका चौधरी यांनी केली. चौधरी यांचे म्हणणे योग्य असून फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याचे सांगत कलेक्शन साठी सगळे सुरु असल्याची टिका नगरसेवक विश्वदीप पवार, निलेश म्हात्रे, राजन आभाळे यांनी केली. संदीप पुराणिक यांनीही गेल्या महिनाभरात किती फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली हे सांगावे असे म्हंटल्यावर मात्र लेखी, दंडात्मक कारवाई केली नसल्याचे उघडकीस आले. त्याची दखल घेत गुरुवारपासून कारवाई करणार असल्याचे आश्वासन पंडित यांनी दिले. पण त्यात सातत्य हवे असा आग्रह प्रमिला चौधरी यांनी धरला. जसे पथक मिळेल तशी कारवाई होणार असल्याचे पंडित म्हणाले. त्यामुळे संतापलेले नगरसेवक म्हणाले की, पश्चिमेला स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसत नाही, तेथे जर कारवाई होऊ शकते तर पूर्वेला का नाही असा सवाल केला. पथक निरिक्षक कमी असून त्यातील मनुष्यबळ अल्प असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले, पण ते ही न पटणारे असल्याचे पवार म्हणाले. डोंबिवली स्थानक परिसरात प्रचंड सावळागोंधळ आहे, पण ठाकुर्ली परिसरातही फेरीवाले आहेत तेथेही कारवाई का केली जात नाही असा सवाल सभापती खुशबु चौधरी यांनी केला. कारवाई हवीच अशी भूमिका त्यांनी घेतली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरात सिग्नल यंत्रणा राबवावी असे आभाळे म्हणाले, त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत त्याची रचना करण्यात आल्याचे स्पष्टीकरण अधिका-यांनी दिली.
वेदपाठशाळेच्या प्रस्तावाला एकमताने मंजूरी :
* केडीएमसी ही राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणुन ओळखली जाते. त्यासाठी या शहरात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ‘वेदपाठ’शाळेची मागणी सातत्याने होत आहे. पुढील पिढीला वेद व त्याचे अध्ययन याची माहिती व्हावी, तसेच वेद ज्यांना शिकायचे आहेत त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था व्हावी. यासाठी वेद्पाठ शाळेचा प्रस्ताव नगरसेवक, स्थायी समितीचे सदस्य संदीप पुराणिक यांनी मांडला. त्या प्रस्तावाला सभापती खुशबू चौधरी, नगसेविका प्रमिला चौधरी, साई शेलार, विश्वदीप पवार, निलेश म्हात्रे आदींनी एकमताने मंजूरी दिली. आगामी काळात तो स्थायी समितीच्या पटलावर पाठवावा असेही ठरले. त्यास सूचक म्हणुन पुराणिक, आणि अनुमोदक म्हणुन राजन आभाळे यांनी बाजू मांडली होती. तसेच त्या प्रस्तावाची प्रत महापालिका सचिवांना पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, कार्यकारी अभियंता -डोंबिवली सुभाष पाटील यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.