मालमत्तांवर जप्तीची पालिकेची कारवाई
By Admin | Published: January 26, 2016 01:56 AM2016-01-26T01:56:01+5:302016-01-26T01:56:01+5:30
महापालिका मालमत्ता विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी चार मालमत्ता जप्त केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
सदानंद नाईक, उल्हासनगर
महापालिका मालमत्ता विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी चार मालमत्ता जप्त केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. एकूण ६० हजार मालमत्ताधारकांना टप्प्याटप्प्यांनी नोटिसा बजावणार असल्याचेही ते म्हणाले.
उल्हासनगर मालमत्ता विभागाची थकबाकी ३०० कोटींवर गेली असून विभागाचे उपायुक्त लेंगरेकर यांनी थकबाकीदारांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ज्यांना नोटिसा दिल्या, त्यांनी थकबाकीची रक्कम भरली नाही. त्यांच्यावर जप्तीची कारवाई सुरू केली. बुधवारी टिलसन मार्केटमागील मारुती कॉम्प्लेक्सचे गाळे जप्त केले. मारुती कॉम्प्लेक्सची थकबाकी १५ लाख २४ हजारांची होती. शिव कॉलनीतील अपनाघर यांच्यासह ३ मालमत्ता जप्त केल्या.
मालमत्ता विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून मालमत्ता कर न भरणाऱ्या एकूण ८० हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठवून कर भरण्याचे आवाहन केले होते. या कारवाईमुळे थकबाकीदारांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विभागाने १२५ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य निश्चित केले आहे. गेल्या आठ महिन्यांत केवळ ३५ कोटींची वसुली झाली आहे. कर निर्धारक शैलेश दोंदे यांनी विक्रमी करवसुली होईल, असा दावा केला.
मुदतवाढीसाठी नागरिकांच्या रांगा
८० हजार थकबाकीदारांना नोटिसा पाठवून मालमत्ता जप्तीचा इशारा दिल्याने शेकडो जणांनी कार्यालयासमोर रांगा लावून थकबाकी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे. मार्चअखेरीस थकबाकीधारकांनी रक्कम अदा केली नाही तर जप्तीची कारवाई तीव्र करण्याचा इशारा विभागाने दिला आहे.