पाळण्यात टाकून मुलींचा ठाणे जि.प.कडून सामूहिक नामकरण सोहळा !
By सुरेश लोखंडे | Published: March 8, 2020 02:57 PM2020-03-08T14:57:59+5:302020-03-08T15:05:19+5:30
नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.
सुरेश लोखंडे
ठाणे : आदिवासी कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या लेकींचा (मुलीं) सामूहिक नामकरण सोहळा म्हणजे बारसे मुरबाडच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडले. शुक्रवारी रंगलेल्या या सोहळ्यात ठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा दीपाली पाटील, यांनीे बालिकांना पाळण्यात टाकून त्यांचे नामकरण केले. याशिवाय बालिकांना पाळण्याच वाटप करण्यात आले.
जि.प.च्या महिला व बाल विकास विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती सपना भोईर, जि.प. सदस्य उल्हास बांगर, सदस्या झुगरे, पंचायत समिती सदस्य सीमा घरत, जया वाघ, पद्मा पवार, स्नेहा धनगर, विष्णू घुडे, प्रगती गायकर, सरपंच हिराबाई हिलम, राजेंद्र भोईर, जिल्हा कार्यक्र म अधिकारी संतोष भोसले प्रकल्प अधिकारी कल्पना देशमुख,सतीश पोळ,राठोड तसेच अंगणवाडी सेविका आणि बालिकांचे माता पिता मोठ्यासंख्येने उपस्थित होते. नवजात बालकांची वाढ सुदृष्ट होण्यासाठी बालकाचे संगोपन झोळ्यात न होता पाळण्यात होणे गरजेचे असते. ही बाब लक्षात घेऊन आता पाळणा, कांगारू किट आणि बाळाच्या संगोपनासाठी बेबी केअर किटचे वाटप यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यात विशेषत: शहापूर , मुरबाड तालुक्यातील आदिवासी भागात अनेक कारणांमुळे बाल संगोपन या महत्वपुर्ण बाबीकडे कुटुंबियांकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. पारंपारिक पध्दतीमुळे बालकांचे संगोपन होत असल्यामुळे त्यांच्या वाढीमुळे विकासाला मर्यादा येतात. आदिवासी खेड्यांमध्ये दोन खांबाना कापडाची झोळी (झोका) बांधून त्याचा वापर बालकांना झोपवण्यासाठी केला जातो. यामुळे देखील आरोग्यविषयक समस्या उद्भवत असल्याचा दावा जिल्हा परिषदेकडून केला जात आहे. या झोळीमुळे बालकांना श्वास घेण्यास त्रास होतो. तर पुरेशी खेळती हवा उपलब्ध होत नाही. झोळीच्या कापडास आर्द्र हवामानामुळे बुरशी संसर्ग होतो, बालकांच्या हालचालीस मर्यादा येतात . याशिवाय जास्त वेळ झोळीत ठेवल्याने एकंदर बालकांच्या वाढ व विकासाला मर्यादा येत असल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा चॅम्पियन्स म्हणून गौरव यावेळी करण्यात आला.
..............फोटो - ०७ठाणे पाळणे