मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या परिसरात सामूहिक नमाज अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:25+5:302021-08-21T04:45:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असतानाच, मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या परिसरात मात्र बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद असतानाच, मुंब्रा अग्निशमन केंद्राच्या परिसरात मात्र बुधवारी रात्री (मगरीब) सामूहिक नमाज अदा करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून समाजातून यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. बुधवारी रात्री मुस्लिम समाजातील काही बांधव केंद्रासमोरील मुख्य रस्त्यावरून चालले होते. त्यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच नमाज अदा करण्याची वेळ झाली होती. त्यामुळे त्यांनी केंद्राच्या परिसरात नमाज अदा करू देण्याची विनंती त्यावेळी कर्तव्य बजावत असलेले सहायक केंद्र अधिकारी हेमंत दिवटे यांना केली. एकूणच परिस्थिती बघून नमाज अदा करण्याची परवानगी देऊन मुंब्य्रातील धार्मिक सौहार्दाची भूमिका कायम राखल्याची माहिती दिवटे यांनी दिली. नमाजाच्या वेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिवटे यांना पाचपाखाडी येथील मुख्य कार्यालयात शनिवारी भेटीसाठी बोलावल्याची माहिती केंद्रातील जवानांनी ‘लोकमत’ला दिली.