ठाण्यातील भास्कर काॅलनीच्या रस्त्याजवळील अवाढव्य हाेल्डींग काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याना साकडे!
By सुरेश लोखंडे | Published: June 5, 2024 05:21 PM2024-06-05T17:21:27+5:302024-06-05T17:21:56+5:30
भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे.
ठाणे : येथील नाेैपाडा परिसरातील भास्कर कॉलनीच्या भर वस्तीत सिताराम भुवन या जुन्या इमारतीत फ्लड लाइट्स लावलेले आवाढव्य जाहिरात फलक (हाेल्डींग) व त्यावरील माेठमाेठ्या लाईटमुळे परिसरात उष्णतामान वाढवले जात आहे. हा प्रखर प्रकाश रहिवाशांच्या घरात येत असल्याने त्यांना त्रास होतो. याशिवाय या हाेल्डींगमुळे घाटकोपरच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती हाेण्याची भीती व्यक्त करून येथील हाऊसिंग साेसायटींमधील रहिवाश्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यावर वेळीच उपाययाेजना करून हाेल्डीग हटवण्याची मागणी रहिवाश्यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह ठाणे महापालिका आयुक्तांकउे केली आहे.
भास्कर कॉलनीच्या सर्विस रोडला लागून चार मजली जुनी सिताराम भवन ही इमारत आहे. या इमारती लगत अवाढव्य जाहिरात होर्डिंग उभारण्यात आले आहे. त्याचा आकार अंदाजे ४० फूट ४० फूट असल्याचा आंदाजही या रहिवाश्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केला आहे. या हाेल्डींगच्या इमारतीजवळ हॉटेल, पानाचे दुकान, टायरवाला व सर्विस रोड हा सतत मोठ्या वर्दळीचा परिसर आहे. या भर नागरी वस्तीमध्ये अवाढव्य होर्डिंगच्या जाहिरातींबोर्डवर तब्बल वीस हाय पावरचे हॅलोजन लॅम्प लावलेले आहेत. त्यामुळे परिसरातील उष्णतेत वाढ झाली आहे. परिसरातील लगतच्या सर्व इमारतीमधील रहिवाशांना प्रखर प्रकाश घरात येत असल्याने त्यांना भयानक त्रास होत आहे. याशिवाय आगामी वादळी पावसादरम्यान घाेटकाेपरप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोठी घटना होण्याची भीती रहिवाश्यांनी व्यक्त करून तत्काळ हाेल्डीग हटवण्याची मागणी लावून धरली आहे.
या अवाढव्य हाेल्डींगमुळे दुर्दैवी घटना घडल्यास मोठी जीवित व वित्त हानी होण्याचा संभव आहे. त्यास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हाेल्डींगवर तात्काळ कारवाई करण्यासाठी रहिवाशांनी कंबर कसली आहे. करदात्यांच्या जीवावर बेतणाऱ्या ह्या जाहिरात फलकांच्या आथिर्क उत्पनास वेळ प्रसंगी मुकावे लागले तरी तरी चालेल, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी या भव्य हाेल्डींगला हलवण्याची मागणी टीएमसी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे जेष्ठ नागरिक महेंद्र माेने यांनी स्पष्ट केले.