महाविद्यालय परिसर झाले ‘व्हॅलेंटाइन’मय
By admin | Published: February 15, 2017 04:31 AM2017-02-15T04:31:17+5:302017-02-15T04:31:17+5:30
लाल रंगाचे हृदयाच्या आकाराचे फुगे, चॉकलेट्स, प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाब तसेच भेटवस्तू देत अनेक तरुण-तरुणींनी मंगळवारी व्हॅलेंटाइन डे
डोंबिवली : लाल रंगाचे हृदयाच्या आकाराचे फुगे, चॉकलेट्स, प्रेमाचे प्रतिक असलेले गुलाब तसेच भेटवस्तू देत अनेक तरुण-तरुणींनी मंगळवारी व्हॅलेंटाइन डे अविस्मरणीय केला. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहे, हॉटेल्स, कॉफी शॉपकडे आपला मोर्चा वळवला. तर अनेक जण कॉलेजबाहेरील कट्ट्यावर रेंगाळले. तर सायंकाळी काही तरुणांनी त्यांच्या हक्काच्या फडके रोडवर हा दिवस साजरा केला.
प्रेमाचा संत व्हॅलेंटाइन. त्याचा नावाने प्रेम दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवसाची तरुणाई चातकाप्रमाणे वाट पाहते. व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी दोन दिवसांपासून मित्र-मैत्रिणींच्या ग्रुप्समध्ये विविध बेत आखले जात होते. कॉलेजमध्ये व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास मनाई असल्याने तरुणाईने कॉलेजबाहेर एकमेकांना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या. अनेक तरुण-तरुणींनी कॉलेज बंक केले. त्यांची पावले हॉटेल्स, कॉफी कॅफे, पिझ्झा हाउसकडे वळली. कॉफी कॅफेत कॉफी व चॉकलेट प्लेवरची लज्जत चाखत प्रेमाचा आनंद घेतला. काहींची कोल्ड तर काहींची फिल्टर कॉफीला पसंती होती. (प्रतिनिधी)