महाविद्यालयीन जीवनातच कौस्तुभला लागले होते सैन्याचे वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:21 AM2018-08-15T03:21:47+5:302018-08-15T03:22:07+5:30
इयत्ता ७ वी पूर्ण झाल्यावर कौस्तुभने रायगड सैनिकी शाळेतून एक महिन्याचे प्रशिक्षण जिद्दीने पूर्ण केले. मीरा रोड परिसरातच बालपण गेले.
मीरा रोड - इयत्ता ७ वी पूर्ण झाल्यावर कौस्तुभने रायगड सैनिकी शाळेतून एक महिन्याचे प्रशिक्षण जिद्दीने पूर्ण केले. मीरा रोड परिसरातच बालपण गेले. शालेय शिक्षण होली क्र ॉस शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रॉयल महाविद्यालय व शैलेंद्र महाविद्यालयामध्ये झाले. इयत्ता ११ वी पासून त्याला सैन्यात जायचे वेध लागले.
पुण्याला शिक्षणासाठी गेला तेव्हा दुचाकी वापरणे बंद करून त्याने सायकल चालवण्यास सुरुवात केली. सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो व व्यायाम पण होतो म्हणून तरु णांचे आकर्षण असलेली दुचाकी त्याने सहज बाजूला ठेवली. पोहणे शिकला. तो खूप वाचन करायचा. जगाच्या इतिहासाचा अभ्यास करणे व युद्धपट पाहणे ही त्याची आवड होती. तरु ण उमलत्या वयातही तो प्रवाहासोबत वहात गेला नाही. त्याला कुठे जायचय हे पक्के ठाऊक होते. प्रवाहाविरोधात पोहण्याची जिद्द व धाडस त्याच्या अंगी होतं. त्याने आपल्या वडीलांकडे एक वर्ष मागितलं होतं. जर काही करून दाखवू शकलो नाही तर तुम्ही जे सांगाल तसं करेन असा शब्द त्याने दिला होता.
धाडसी आणि साहसी असलेला कौस्तुभ सैन्यातील अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात साडेचार वर्षे सतत सीमेवर किंवा आॅपरेशन मध्येच रमला. त्याला कार्यालयात काम करण्यापेक्षा रणांगणावर शत्रूंशी दोन हात करणे आवडायचे. हिमसख्खलन झाले तेव्हा लष्कराने राबवलेल्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये कौस्तुभ सहभागी झाला होता. त्यावेळी तीन जवानांना रेस्क्यू करण्यात आले होते. केरन सेक्टर असो वा गेल्या जुलैला राबवलेले आॅपरेशन लष्करी आॅपरेशनमध्ये तो नेहमी पुढे असायचा.
कौस्तुभ लष्करात सर्वांचा लाडका होता. स्वातंत्र्यदिनी सर्वत्र ‘जो शहीद हुए उनकी याद करो कुर्बानी’ या गीताचे सूर आळवले जातील तेव्हा राणे कुटुंबाला कौस्तुभची प्रकर्षाने आठवण होईल. मात्र त्याचवेळी हजारो तरुण कौस्तुभपासून प्रेरणा घेऊन सीमेवर छातीचा कोट करुन उभे असतील ही भावना सुखावूनही जाईल...
कौस्तुभच्या फोनची आम्ही वाट पाहत आहोत
यंदा २६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते कौस्तुभला सेना पदक मिळाले. ही कौस्तुभच्या देशसेवेला मिळालेली मोलाची पोचपावती होती. देशासाठी अजून खूप काही करायचं त्याचं स्वप्न होतं.
आमचा कौस्तुभ कोठेही गेलेला नाही. तो कुठेतरी सीमेवर देशाच्या संरक्षणात गुंतलेला आहे. तो फोन करेल, त्याच्या फोनची वाट पाहतोय.सणाच्या दिवशी त्याची आठवण तर येणारच.असाही तो घरी यायचा.सणासाठीच. मुलगा अगस्त्यबद्दल त्याची खूप स्वप्ने होती.