रंगात रंगणार पण भिजणार नाही
By admin | Published: March 22, 2016 02:22 AM2016-03-22T02:22:13+5:302016-03-22T02:22:13+5:30
डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर
जान्हवी मोर्ये, डोंबिवली
डोंबिवली पश्चिमेकडील जयमनीषा, तुलसी साई विहार, टाटा पॉवर लाइन येथील जय साई सागर, कल्याण येथील देशमुख होम्स अशा एक ना अनेक सोसायट्यांनी यंदा एकतर धुळवडीत सहभागी व्हायचे नाही किंवा रंग खेळताना निदान पाण्याचा वापर करायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. सध्या भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील अधिकाधिक सोसायट्या त्यांचेच अनुकरण करतील, अशी आशा आहे.
पाणीबचतीचा संदेश देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील काही नागरी सहकारी सोसायट्यांनी बिनपाण्याने धूळवड साजरी करण्याचा निर्धार केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ‘जयमनीषा’ सोसायटीचे सचिव गणपत सावंत यांनी सांगितले की, गेल्या २५ वर्षांपासून आमच्या सोसायटीत विविध सण-उत्सव एकत्र साजरे केले जातात. त्यात होळीसुद्धा साजरी करतो. धूळवड हा तर सर्वांच्या आवडीचा व आनंदाचा सण आहे. मात्र, यंदा पाणीटंचाई पाहता आमच्या सोसायटीतील रहिवासी धुळवडीत पाण्याचा वापर करणार नाही. केवळ रंग एकमेकांना लावून आम्ही सण साजरा करणार आहोत. बुधवारी होळीपूजनाचा कार्यक्रम होईल, पण धुळवडीला पाण्याचा वापर करायचा नाही, असा ठरावच सोसायटीच्या बैठकीत आम्ही केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील तुलसी साई विहार सोसायटीचे अध्यक्ष अनिल भोईर यांनी सांगितले की, इमारतीत पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे. बोअरवेलचे पाणी आम्ही इतर कामांसाठी वापरतो. इमारतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. इमारतीच्या नळाला अर्धा तास पाणी येते. पाण्याचे नियोजन आमच्याकडे असले तरी आम्ही पाण्याचा जपून वापर करीत आहोत. पाणी असले तरीही यंदा आम्ही धुळवडीला पाण्याचा वापर करणार नाही. थोड्या प्रमाणात रंगाचा वापर करून उत्सव साजरा केला जाणार आहे.
टाटा पॉवर लाइनजवळील जयसाई सागर इमारतीचे सरचिटणीस शिवशंकर प्रजापती यांनी सांगितले की, आमच्या इमारतीत नळाला दोन ते तीन दिवसांनी पाणी येते. इमारतीतील रहिवाशांना पाण्यासाठी १८०० रुपये खर्च करून टँकर मागवावा लागतो. घरकामासाठी इतर ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत धुळवडीकरिता पाण्याचा वापर कसा करणार. त्यामुळे आमच्या सोसायटीत यंदा रंग खेळणार नाही. केवळ रंगाचा टिळा कपाळावर लावून सण साजरा केला जाणार आहे.
कल्याण पूर्वेकडील देशमुख होम्सचे अमरसेन चव्हाण यांनी सांगितले की, त्यांच्या सोसायटीत एक हजार नागरिकांची वस्ती आहे. १७ फेब्रुवारीपासून सोसायटीच्या नळाला पाणीच आलेले नाही. सोसायटी मोठी असल्याने कोट्यवधींची पाणीबिले आम्हाला पाठवली गेली आहेत. बिले येतात, पाणी मात्र येत नाही. त्यामुळे यंदा धुळवडीला पाणी आणि रंग खेळायचे नाहीत, हे ठरले आहे.