खाण्यास अयोग्य बर्फ होणार रंगरंगिला
By admin | Published: May 11, 2017 01:55 AM2017-05-11T01:55:02+5:302017-05-11T01:55:02+5:30
खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : खाण्यास योग्य नसलेल्या बर्फावर एकीकडे करडी नजर ठेवून तो सहज ओळखता यावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने अनोखा फंडा शोधला आहे. यानुसार, त्या बर्फात कोणताही रंग टाकून त्याला रंगीबेरंगी करण्याच्या सूचना ते फॅक्टरीचालकांना करणार आहेत. त्यामुळे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ आता रंगरंगिला होणार आहे. याबाबत, लवकरच ठाणे जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलावून त्यांना सूचना करणार असल्याचे एफडीए सूत्रांनी सांगितले.
ऐन उन्हाळ्यात मुंबईत ग्रॅस्टो साथ पसरल्याने ठाणे अन्न व औषध प्रशासनाने ठाणे-पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ९ दिवसांत सुमारे १०२ ठिकाणी तपासणी करून खाण्यास अयोग्य असलेला जवळपास २१ हजार किलो बर्फ नष्ट केला. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांनी याबाबत ३ मे रोजी तातडीची बैठक बोलवली होती. त्या वेळी खाण्यास योग्य नसलेल्या बर्फाबाबत त्यांनी काही सूचना केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
ठाणे जिल्ह्यात जवळपास ४० ते ४५ बर्फाची निर्मिती करणाऱ्या फॅक्टरीज आहेत. त्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या प्रकारे बर्फ तयार केला जातो. यामध्ये ६ फॅक्टरीतखाण्यास योग्य असलेला, तर उर्वरित फॅक्टरीतखाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार केला जात आहे. खाद्य दर्जाचा असलेला बर्फ हा बार, हॉटेल्स आदी ठिकाणी नाही तर, तो मासळीची साठवणूक करण्यासाठीही वापरतात. तर, खाण्यास अयोग्य बर्फ जर मासळी साठवणुकीसाठी वापरल्यास त्यातील जिवाणू त्या मासळीत जाऊन ते घातक ठरू शकतात. त्यामुळे वेळीच खबरदारी म्हणून फॅक्टरीचालकांना याबाबत त्याचे परिणाम गांभीर्याने निदर्शनास आणून देण्यासाठी बर्फामध्ये रंगाचा वापर करण्याचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
याबाबत, माहिती देण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील बर्फ फॅक्टरीचालकांची बैठक बोलवली आहे. त्या वेळी यापुढे खाण्यास अयोग्य असलेला बर्फ तयार करताना, प्रामुख्याने त्यामध्ये रंगाचा वापर केल्यास तो सर्वांनाच सहजतेने ओळखता येईल, हा यामागचा उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले.