शाळेच्या आठवणींत ज्येष्ठांचा रंगला सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:00 AM2021-02-23T05:00:08+5:302021-02-23T05:00:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शाळेच्या संस्मरणीय आठवणींत ७२ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट सामना सोमवारी सेंट्रल मैदानावर रंगला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शाळेच्या संस्मरणीय आठवणींत ७२ वर्षांवरील माजी विद्यार्थ्यांचा क्रिकेट सामना सोमवारी सेंट्रल मैदानावर रंगला होता. मो. ह. विद्यालयाच्या १९६५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टूगेदर निमित्ताने आयोजित केलेल्या या सामन्याने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी शाळेचे माजी शिक्षक गणेश पेंडसे सरदेखील उपस्थित होते. कोणी गप्पा मारल्यास बाकावर उभे केले जाईल, असे सांगून त्यांनी मनोगताची सुरुवात करताच सर्व माजी विद्यार्थ्यांमध्ये एकच हंशा पिकला.
मो. ह. विद्यालयाच्या १९६५ बॅचच्या ७२ वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा हा सामना होता. त्यामुळे बघ्यांमध्येही उत्सुकता दिसून येत होती. सकाळी ८.३० वाजता सर्व माजी विद्यार्थी मैदानावर जमले. एकूण ४५ जण होते. लहानपणी जसे खेळताना चिठ्ठी टाकली जायची तसे पुन्हा चिठ्ठी टाकून दोन संघातील सदस्य वाटून घेण्यात आले. एकूण २२ जणांनी क्रिकेट खेळण्याचा उत्साह दाखविला. दोन्ही संघात प्रत्येकी ११ जण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे दोन्ही संघांना माजी शिक्षकांची नवे देण्यात आली होती. सुबोध देशपांडे सर आणि गणेश पेंडसे सर हे दोन संघ आमने सामने खेळविण्यात आले. देशपांडे सर संघाचे निनाद आठल्ये यांनी, तर पेंडसे सर संघाचे केशव गलांडे या माजी विद्यार्थ्यांनी नेतृत्व केले. यात देशपांडे सरांचा संघ २ धावांनी विजयी झाला. त्यांनी १३ ओव्हरमध्ये ३९, तर पेंडसे सर संघाने ३७ धावा काढल्या. विशेष म्हणजे प्रत्येक सदस्याला खेळण्याची संधी देण्यात आली होती. स्थानिक नगरसेवक सुनेश जोशी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. पेंडसे सरांनी आपल्या मनोगतात हा क्रिकेट सामना इतरांना प्रेरणादायी असल्याचे सांगून आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या गप्पा रंगल्या आणि पुन्हा भेटू, असे म्हणत एकमेकांचा निरोप घेतला.
-------------
विजेता संघ : सुबोध देशपांडे सर संघ
उपविजेता संघ : गणेश पेंडसे सर संघ
सामनावीर : केशव गलांडे
उत्कृष्ट फलंदाज : चंद्रकांत लोखंडे
उत्कृष्ट गोलंदाज : अशोक केळकर
---------------
फोटो मेलवर