ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर रंगल्या संगीतोपयोगी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:47+5:302021-06-16T04:52:47+5:30
ठाणे : ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर संगीतोपयोगी कार्यशाळा रंगल्या. पहिल्या कार्यशाळेत ज्येष्ठ योगगुरु बापू भोगटे यांनी संगीतोपयोगी योगसाधना या विषयावर ...
ठाणे : ब्रह्मांड संगीत कट्ट्यावर संगीतोपयोगी कार्यशाळा रंगल्या. पहिल्या कार्यशाळेत ज्येष्ठ योगगुरु बापू भोगटे यांनी संगीतोपयोगी योगसाधना या विषयावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या कार्यशाळेत सुप्रसिद्ध संगीतकार व म्युझिक प्रोग्रामर भारत शिंदे यांनी स्टुडिओ रेकॉर्डिंग संदर्भातील तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.
ब्रह्मांड कट्ट्याने संगीत शिक्षणाच्या दृष्टीने पाऊल उचलले असून ऑनलाईन माध्यमाद्वारे जून महिन्यात मोफत संगीत कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. जून महिन्यातील संगीत कार्यशाळा ५ जून व १३ जून २०२१ अशा दोन सत्रात पार पडल्या. ऋजुता देशपांडे यांनी तांत्रिक तसेच सूत्रसंचालन करून दोन्ही कार्यशाळांचा डोलारा सांभाळला.
प्राणायाम, ॐकार आणि भ्रामरी अशा विविध संगीतासाठी उपयुक्त अशा योगप्रकारांची बापू यांनी सखोल माहिती दिली. भारत यांनी गाण्याची विविध अंग, डिजिटल रेकॉर्डिंग, माईकचे प्रकार व हाताळण्याचे तंत्र, स्टेज शो व रेकॉर्डिंग यातला फरक अशा अनेक तांत्रिक बाबींवर प्रकाशझोत टाकत मोलाचे मार्गदर्शन केले. दोन्ही सत्रांमध्ये संगीतप्रेमींचा उत्तम प्रतिसाद लाभला. प्रश्नोत्तरांच्या सत्रात रसिकांनी सक्रिय सहभाग दर्शवून तज्ज्ञांकडून प्रश्नांचे शंकानिरसन करुन घेतले. कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांनी तज्ज्ञांचे आभार मानले.