भिवंडीत मंत्री कपिल पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगली राजकीय जुगलबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 07:51 PM2021-11-26T19:51:31+5:302021-11-26T19:51:56+5:30
Bhiwandi News: भिवंडीमध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि राज्य सरकारमधील मंत्री कपिल पाटील यांच्यात सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.
-नितिन पंडीत
भिवंडी - जो विद्यार्थी शाळेच्या बाहेर बसून शिकला त्या विद्यार्थ्याने देशाची राज्यघटना लिहिली हे आमच्यासाठी गौरवाचे असून डॉ बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळेच देशात सर्वश्रेष्ठ अशी लोकशाही नांदत आहे असे गौरवोद्गार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत मनपा मुख्यालयासमोर उभारलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उदघाटन प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी व्यक्त केले . संविधानामुळेच भारत देश एकसंघ आहे त्यामुळे प्राण गेला तरी बेहत्तर पण संविधान बदलून देणार नाही अशी शपथ घेण्याचा सल्ला मंत्री आव्हाड यांनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित भीम अनुयायांना दिला . त्यानंतर ओबीसी आरक्षणावर बोलतांना मंत्री आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पक्ष बाजूला ठेवून केंद्र सरकारमुळे ओबीसींचे आरक्षण रद्द होत आहे याचा निषेध करण्याचा सल्ला दिला.
त्यांनतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्याच्या मुलाला मिळाली हे माझे भाग्य आहे आणि हीच संविधानाची ताकद आहे. आता इंदू मिलच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा लवकरात लवकर बसवावा अशी विनंती वजा कोपरखळी मंत्री पाटील यांनी मंत्री आव्हाड तसेच मंत्री एकनाथ शिंदे यांना लगावली. तसेच राज्याचे गृहनिर्माण व नगरविकास मंत्र्यांनी ठाणे शहराचा विकास केला मात्र भिवंडी शहराचा विकास अजूनही हवा तास झालेला नाही त्यामुळे शहर विकासात समानता आणून भिवंडीच्याही विकासाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे असा खोचक सल्ला देखील मंत्री पाटील यांनी यावेळी मंत्री आव्हाड व शिंदे यांना लगावला. त्यांनतर कुठेही काही झाले तरी जो तो उठतो आणि खासदारांवर आरोप करतो अशी खंत मंत्री पाटील या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली. त्यामुळे सल्ला मसलत व आरोप प्रत्यारोपांमधून या कार्यक्रमात राजकीय जुगलबंदी अधिकच पाहायला मिळाली.