ब्रह्मांड कट्ट्यावर रंगला सप्तरंगी भावनांचा स्वराविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:13+5:302021-03-18T04:40:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ आणि या जीवनात रंग भरते ते भावभावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य! प्रेम, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ आणि या जीवनात रंग भरते ते भावभावनांचे सप्तरंगी इंद्रधनुष्य! प्रेम, मैत्री, चैतन्य, उत्कंठा, लाडीगोडी, विरह या व अशा अनेक भावनांनी नटलेला स्वराविष्कार ‘ब्रह्मांड कट्ट्या’च्या ‘सतरंगी रे!’ या कार्यक्रमात कलाकारांनी सादर केला. गायनाबरोबरच नृत्य व अदाकारीने या कार्यक्रमास चार चांद लावले.
ब्रह्मांड कट्ट्यातर्फे ‘सतरंगी रे’ हा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रविवारी ऑनलाइनद्वारे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात ऋजुता देशपांडे यांच्या गणेश स्तवनाने झाली. वर्षा गंद्रे यांच्या ‘रोज रोज डाली डाली’ या यमन रागातील मधुर गीताने वातावरण ताजे केले. त्यानंतर ‘बाहो मे चले आओ’ या ऋजुता यांच्या सुमधुर सादेने रसिकांच्या हृदयाला हात घातला.
‘कितिदा नव्याने तुला आठवावे’ हे गीत विद्या जोशी यांनी, तर नीलेश महाडिक यांनी ‘अब तेरे बिन’, डॉ. अविनाश जोशी यांनी ‘ओ हंसिनी' आदी गाणी सादर केली. वर्षा व नीलेश यांच्या ‘गोमू संगतीनं’ व ‘हवा के साथ साथ’ या गाण्यांनी रंगत आणली. नीलेश व अविनाश यांचे ‘ये दोस्ती’ मैत्रीचा रंग उधळून गेले. डॉ. अविनाश व विद्या यांच्या ‘तुझे देखा तो ये जाना सनम’, ‘गली गली मे फिरता हैं’ या द्वंद्वगीताने रसिकांना पावले थिरकण्यास भाग पाडले. ‘ही नवरी असली’ हे गीत नीलेश व ऋजुता यांनी सादर केले, तसेच विद्या यांचे ‘रूपेरी वाळूत’, डॉ. अविनाश यांचे ‘निले निले अंबर पर’, नीलेश यांचे ‘जिंदगी एक सफर’ या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.
कार्यक्रमाच्या शेवटी ‘जिंदगी मिल के बिताएंगे’ या समूहगीताने भावभावनांच्या सप्तरंगी सोहळ्याची सांगता केली. कार्यक्रमाचे निवेदन पूनम रेडेकर यांनी
केले.
---------------------