होळीचे रंग यंदाही होणार बेरंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:02+5:302021-03-26T04:41:02+5:30
ठाणे : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या होळीच्या सणावर यंदाही कोरोनाचे सावट आल्याने होळीचे रंग बेरंग होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या ...
ठाणे : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या होळीच्या सणावर यंदाही कोरोनाचे सावट आल्याने होळीचे रंग बेरंग होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या या काळात सार्वजनिक होळी साजरी करण्यावर निर्बंध असले तरी विक्रीवर बंदी नसल्याने दुकानांत होळीचे रंग, पिचकाऱ्या आणि फुगे विक्रीसाठी आले आहेत. मात्र गेल्यावर्षीप्रमाणे याही वर्षी खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे.
कोरोनाच्या रुग्णांत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत. तीन दिवसांवर आलेल्या होळी आणि धूलिवंदनावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे चिनी बनावटीच्या रंग आणि पिचकाऱ्यांवर बहुतांश ठाणेकरांनी बहिष्कार टाकला होता. बाजारात दरवर्षी चिनी बनावटीच्या रंग आणि पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. कोरोनामुळे सोशल मीडियावर चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन केले जाऊ लागले आणि या रंग आणि पिचकाऱ्यांकडे पाठ फिरवित काहींनी फक्त नैसर्गिक रंगाची खरेदी केली. कोरोनाच्या भीतीपोटी गेल्या वर्षी ठाणेकरांनी घरातच बसणे पसंत केले होते. यंदा पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. त्यामुळे सार्वजनिक होळी साजरी करण्यावर आणि धुळवड खेळण्यावर बंदी असली तरी रंग, फुगे, पिचकारी यांच्या विक्रीवर मात्र बंदी नाही, असे ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी लोकमतला सांगितले.
काही विक्रेत्यांनी नवा माल खरेदी केला आहे, तर काही जुन्याच मालाची विक्री करीत आहेत. जिथे ५० किलो रंगाची खरेदी होत होती, तिथे ५ किलो होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मुलांसाठी पिचकारी खरेदी करताना पालक नजरेस पडत आहेत. दुसरीकडे शासनासह सामाजिक संस्थाही घरात सुरक्षित राहा, कोरोनाला आमंत्रण देऊ नका असे आवाहन करीत आहे. होळीला तसेच, धूलिवंदनाला सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे पालिकेने सांगितले.
--------------
होळी, धूलिवंदन जवळ आले की दुकानांमध्ये पिचकारी, रंग यांच्या खरेदीसाठी गर्दी होते; परंतु होळीला केवळ तीन दिवस शिल्लक असले तरी दुकानांत शुकशुकाट आहे, फार कमी लोक खरेदी करत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
......................