निवडणूक कामांसह मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात लागणाऱ्या ३२७३ बसेस-ट्रक्ससह जीपगाड्यांची जुळवाजुळव
By सुरेश लोखंडे | Published: October 8, 2019 07:46 PM2019-10-08T19:46:15+5:302019-10-08T19:53:53+5:30
भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची शोधाशोध जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात २१३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या या प्रचारास दसऱ्यांच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला. पण यानंतर भरारी पथके, मतदान केंद्र, मतमोजणीच्या कामांसाठी लागणारे अधिकारी, कर्मचारी व साहित्य पुरवठा करण्यासाठी जिल्हह्यातील १८ मतदारसंघाना तब्बल तीन हजार २७३ वाहनांची जुळवाजुळव करण्यासाठी जिल्हा प्रशासनास सध्या तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कामांसाठी जिल्ह्यातीला शासकीय व निमशासकीय ४४ कार्यालयांचे १६२ वाहने जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. सध्यास्थितीला जिल्हह्याभरातील १८ मतदारसंघांमध्ये कार्यरत असलेले विविध स्वरूपांचे भरारी पथकांना जवळपासून १८४ जीव गाड्यांची गरज आहे. अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या जमा केलेल्या वाहनांपेक्षा भरारी पथकांना जादा वाहने लागत आहेत. या भरारी पथकांचे प्रमुख अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्यां वाहनांची पुर्तता करणे शक्य झाले नाही. यामुळे संबंधीत मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अखेर वाहने भाड्याने घेण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त अन्यही कामांसाठी वाहनांची शोधाशोध जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.
जिल्ह्यातील १८ मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर आवश्यक अधिकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मतमोजणी केंद्रांवरील साहित्य, अधिकारी कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी लागणाऱ्यां या तब्बल तीन हजार २७३ वाहनांची देखील शोधाशोध सुरू आहे. यामध्ये २० ते २१ आॅक्टोबर या दोन दिवसांसाठी लागणाऱ्यां एक हजार ३५२ बसेसची गरज आहे. यामध्ये ५० आसनांसह ४२ व ३० असनांच्या मिनी बसेसचा देखील समावेश आहे. या सर्व बसेसपेकी काही बसेस एसटी महामंडळाकडून घेतल्या जाणार आहेत. तर काही बसेस ठाणे, नवी मुंबई, मीरा भार्इंदर व कल्याण डोंबिवली आदी महापालिकांच्या परिवहन सेवेच्या बसेस आणि काही खाजगी बसेसचा वापर या निवडणुकीच्या कामांसाठी केला जाणार आहे.
याप्रमाणेच ३२ ट्रक्स, २६ टेम्पो, पाच कंटेनर आणि एक हजार ४३३ जीप गाड्या, ७९ कार आदी दोन हजार ९२७ वाहनांची गरज भागवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आरटीओ कार्यालयाची मदत घ्यावी लागत आहे. त्यांच्या मार्फत ही वाहने उपलब्ध करण्यासाठी जोरदार प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाले आहेत. आरटीओ कार्यालयाच्या भाडे दारानुसार ही वाहने उपलब्ध होत आहेत. यासाठी दोन इस्पेक्टर व एक एआरटीओ आदी वरिष्ठ ुअधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहेत. जिल्ह्यातील या मतदान प्रक्रियेच्या कामांसाठी लागणाऱ्यां वाहनांच्या शोधात जिल्हा प्रशासनाप्रमाणेच आरटीओ विभागातील अधिकारी,कर्मचारी बसेस, ट्रक्स व कंटेनरच्या शोधात आहेत.