समाजाला जोडणाऱ्या दुव्यांना एकत्र करा : डॉ.अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 04:57 PM2018-11-18T16:57:20+5:302018-11-18T18:12:40+5:30
समाजव्रती, शिक्षणव्रती व कार्यव्रती पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ठाणे : समाजाला जोडणाऱ्या दुव्यांना एकत्र करा" असे प्रतिपादन डॉ.अनिल काकोडकर यांनी वी नीड यू सोसायटीच्या समाजव्रती, शिक्षणव्रती व कार्य व्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर यांच्या ओम नमो जाड्या, व पसायदान यावर भावमुद्रेतून आपली कला सादर केली व कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत खादीचा रुमाल देऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद घारपुरे यांनी केले. वी नीड यू सोसायटीचा विस्तृत परिचय पीपीटीच्या द्वारे विश्वस्त जयंत कुलकर्णी यांनी करू दिला. अतुल गोरे यांनी डॉ.अनिल काकोडकर यांचा विस्तृत परिचय करून दिला. डॉ. अनिल काकोडकर यांनी शांतते करता अणू विज्ञान विकास हा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारला व देशाला दिशा दिली. सर्व पुरस्कार मिळालेल्याना डॉ.अनिल काकोडकर यांच्या हस्ते मानपत्र व पंचवीस हजार रुपयांचा चेक देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षणव्रती पुरस्कार- ठाणे आर्ट्स सोसायटीच्या नीलिमा कढे या केवळ कला शिक्षक नाहीत तर नृत्य तसेच इंडोलॉजी या विषयात पीएचडी पूर्ण करणाऱ्या हरहुन्नरी व्यक्ती आहेत. नीलिमा कढे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सर्व हितचिंतक व सहकारी यांचे आभार मानले. हे यश सर्वांचे आहेच पण आव्हान आहे ते सातत्य टिकवण्याचे आहे. कार्यव्रती पुरस्कार: हेमंत जगताप हे स्वत: सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी सरकारी नोकरी करत असताना त्यांनी ठाणे व पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात एकूण ४२२ छोटे बंधारे बांधून व हे तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेऊन त्यांना त्याची काळजी घेण्याचे शिक्षण देऊन प्रशिक्षित केले आहे. दोन लाख जनतेचा पाण्याचा प्रश्न यामुळे सुटला आहे. या वैशिष्ट्य पूर्ण कामासाठी हा पुरस्कार देण्यात आला. मी रोटरी इंटरनॅशनल व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन संस्थामुळेच हे कार्य होऊ शकले. पाणी साठवण्याची सोपी पद्धत व कंत्राटदार नको या सूत्रातून हे काम झाले हे नोंदविण्याची गरज आहे. मोठी धरणे अनेक प्रश्न निर्माण करतात. म्हणून पाणी प्रश्न सोडविण्याचा हाच सोपा व कमी खर्चिक मार्ग आहे. मिलिंद बल्लाळ आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले, आज मिळालेली संधी ही अपूर्व आहे. सर्व सत्कार मूर्ती ज्या संस्थेने निवडल्या त्या अत्यंत योग्य असून त्यांचे कार्य हे विशेष आहे. करुणा व प्रेम या दोन्ही गोष्टी हळू हळू कमी होत चालल्या आहेत. त्यामूळे वॉटर हारर्व्हेस्टिंग जसे करावे लागते तसेच समाजात करुणा व प्रेम याचे हारर्व्हेस्टिंग करण्याची गरज आहे. ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांचा सत्कार डॉ.अनिल काकोडकर यांनी केला. समाज व्रती पुरस्कार प्राप्त चारुशीला देऊलकर म्हणाल्या कि, कोकणी माणसाला सल्ला देणे हेच मुळी किती जिकिरीचे असेल याची कल्पना करू शकतो. समुपदेशन क्षेत्रात गेली 25 वर्ष मालवण सारख्या टोकाच्या गावात हे काम सुरू असून त्यात महिलांना मानसिक आधार, व्यावसायिक आधार व कायदेशीर आधार बॅरिस्टर नाथ पै सेवांगण या संस्थेतर्फे हे काम सुरू आहे. हे महिलांमधील काम आव्हानात्मक होते व आहे. घरची दुखणी बाहेर जाऊन कशी सांगायची? या पेचातुन सुटायला दीड ते दोन वर्षे धीर धरून सल्ला केंद्र सुरू ठेवले. आता विश्वास बसला आहे. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुण तरुणीच्या आत्महत्या वाढल्या आहेत. साधारण महिन्याला हा आकडा 20 ते 22 झाला आहे. हा नवा पेच आहे, यावर सामूहिक चिंतनातून मार्ग काढणे गरजेचे आहे. डॉ.काकोडकर यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली त्याबद्दल त्यांना मानपत्र व शाल देऊन सत्कार मिलिंद बल्लाळ व डॉ.मकरंद घारपुरे यांनी केला. डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, समाजात विविध प्रश्नांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना शोधून समाजासमोर आणण्याचे काम वी नीड यू सोसायटीने केले हे महत्वाचे आहे. कला, समुपदेशन व पाणी या तिन्ही जीवनावश्यक गोष्टी आहेत. हे कार्य करणारे सर्वजण केवळ स्वतःपूरता कार्यरत नसून समाजकरिता काम हेच भव्य स्वप्न आहे. वी नीड यू सोसायटीने अश्या सर्व संस्था व व्यक्ती याना जोडणारा दुवा होण्याची गरज आहे. आभार प्रदर्शन अतुल गोरे यांनी केले. तर सुत्रसंचलन संजीव साने यांनी तर ध्वनी व प्रकाश संयोजन रुपेश मोरे यांनी केले.