भिवंडीत वादळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीबद्दल संयुक्त पंचनाम्याची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 01:15 PM2017-10-26T13:15:21+5:302017-10-26T13:15:25+5:30
परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.
भिवंडी- परतीच्या वादळी पावसाने तालुक्यातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या दरम्यान शेतकऱ्यांच्या पीकांच्या झालेल्या नुकसान प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनाम्याची मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत बुधवारी तहसील कार्यालयात बैठक पार पडली.
तालुक्यात भातपीकाचं एकुण क्षेत्र १६ हजार ७४१.६० हेक्टर असून त्यामध्ये सुमारे २० हजार १३ शेतकरी दरवर्षी भातशेती करीत असतात. भातशेतीत गुजराथ ४, कर्जत-३, जया ही हळवी पीकं घेतली जातात. तर निमगरम जातीची गुजराथ ११ व १७ आणि पुनम ही पीके घेतली जात आहेत. या वर्षी अपेक्षीत पाऊस झाल्याने चांगलं पीक आलं होतं. पण परतीच्या वादळी पावसाने शेतातील पिकांच नुकसान झालं.
सततच्या वीस दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसांत तालुक्यातील ७३३७.३३हेक्टर क्षेत्र बाधित झाले असुन सुमारे ८२१९ शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी कार्यालयाकडून वर्तविला जात आहे. त्यापैकी ६६०६.७८ हेक्टर शेतीमध्ये भातशेतीचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर ७३०.५५ हेक्टर क्षेत्रांत ३३टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकाची संयुक्त पंचनाम्याची मोहिम काल बुधवारपासुन राबविण्याची सुरूवात झाली असुन त्याकरीता तहसिल कार्यालयांत या बाबत मिटींग झाली असता तहसिलदार शशीकांत गायकवाड व कृषी अधिकारी वाघचौरे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार ग्रामसेवक,तलाठी व कृषी सहाय्यक यांचे पथक तालुक्यात फिरून बाधित शेतकऱ्यांची माहिती घेणार आहेत.
गावनिहाय व शेतकरीनिहाय हे पंचनांमे करून मिळविलेली माहितीचा अहवाल तहसिलमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे.दरम्यान सोमवार २३ ऑक्टोबर रोजी जमीन बचाव शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंबाडी येथे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन करून रस्ता रोको केला होता.त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.