पुढल्या वर्षी लवकर या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:33 IST2019-09-14T00:32:51+5:302019-09-14T00:33:14+5:30
गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीनिमित्ताने शेकडो गणेशभक्तांनी तपोवन, गोदापार्क, रामकुंड, तसेच गंगाघाटावर गणरायाचे विधिवत पूजन केले.

पुढल्या वर्षी लवकर या...
पंचवटी : गुलालाची उधळण करत व ढोल-ताशांच्या गजरात गुरुवारी (दि.१२) गणरायाचे विधिवत विसर्जन करून गणेशभक्तांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पांना निरोप दिला. अनंत चतुर्दशीनिमित्ताने शेकडो गणेशभक्तांनी तपोवन, गोदापार्क, रामकुंड, तसेच गंगाघाटावर गणरायाचे विधिवत पूजन केले.
गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू झाल्यानंतरदेखील भाविकांचा उत्साह कायम होता. नदीपात्र परिसरात आल्यानंतर गणपतीचे विधिवत पूजन व आरती करून बाप्पांना मोदक खिरापत नैवेद्य दाखवत भक्तांनी गणेशमूर्तीचे नदीपात्रात विसर्जन केले, तर काहींनी पर्यावरणपूरक विसर्जन केले. ज्या भाविकांनी मूर्तिदान करायची आहे. त्यांच्यासाठी महापालिका प्रशासनाने संपूर्ण गंगाघाट, तपोवन, आडगाव, म्हसरूळ, पेठरोड, मेरी, सरस्वतीनगर, परिसरात मूर्ती संकलन केंद्र उभारलेले होते. भाविकांनी नदीपात्रात मूर्ती बुडविल्यानंतर त्या मूर्ती महापालिका प्रशासनाने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रात जमा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी भाविकांनी मूर्तिदान करावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात होते. संध्याकाळी मालेगाव स्टँड येथे पंचवटी शांतता समितीतर्फे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. पंचवटीतील सेवाकुंज येथील आई सप्तशृंगी मित्रमंडळ, गजानन चौक मित्रमंडळ, सत्यबाल मित्रमंडळ, मानेनगर फ्रेंड सर्कल, यंग स्टारमित्र मंडळ, अचानक मित्रमंडळ, सरदारचौक मित्रमंडळ, कैलास युवक मित्रमंडळ, भगवती कला मित्रमंडळ, मालवीय चौक मित्रमंडळ, गुरुदत्त सामाजिक कला, क्र ीडामंडळ, नवीन आडगाव नाका मित्रमंडळ, दुर्गा फ्रेंड सर्कल, संजयनगर मित्रमंडळ, मालेगाव स्टँड मित्रमंडळ, कृष्णनगर मित्रमंडळ, नागचौक मित्रमंडळ, तारवालानगर मित्रमंडळ, शंभुराजे फ्रेंड सर्कल आदींसह भागातील मित्रमंडळांनी गणरायाचे विधिवत विसर्जन केले.