ठामपात कोविड टेंडर घोटाळा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:43+5:302021-06-22T04:26:43+5:30
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी कमी दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला कंत्राट न देता दुप्पट ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या व्यवस्थापनासाठी कमी दराने निविदा भरणाऱ्या कंपनीला कंत्राट न देता दुप्पट दराने कंत्राट भरणाऱ्या कंपनीला कंत्राट दिला असल्याचा आरोप सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.
विशेष म्हणजे ज्या कंत्राटदाराने कमी दारात टेंडर भरले होते त्यांना त्यांच्या दारात काम न करता दुप्पट दारात काम करण्यास दबाव टाकण्यात आला होता. हे करण्यासाठी प्रशासनावर ठाण्यातील एका मोठ्या नेत्याचा दबाव होता असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर कमी पहिल्या दराने निविदा भरणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करून दुप्पट दराने निविदा भरणाऱ्या ओम साई प्रा.लि. या कंपनीला कंत्राट दिली आले. या संपूर्ण टेडंर घोटाळ्याची चौकशी सीआयडीमार्फत करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
कोविड रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी ठाणे महापालिकेतर्फे टेंडर काढण्यात आले होते. यामध्ये तीन निविदाकारांनी टेंडर भरले. सर्वात कमी ऑल इन सर्व्हिसेस या कंपनीने दोन हजार ३०० या दराने टेंडर भरले, तर ओम साई प्रा. लि. कंपनीने हे टेंडर चार हजार ४०० या दराने भरले. त्यामुळे ऑल इन सर्व्हिसेस या कंपनीला काम दिले. मात्र, त्यांना या दराने काम न करता जास्त दराने काम करण्यास दबाव टाकला. त्यानंतर वाटाघाटी करून ओम साई प्रा.लि. कंपनीला यामध्ये समावेश करून घेतल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या स्टाफमध्ये खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर हा घोटाळा समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर ऑल इन सर्व्हिसेसचा काढून ठेका काढून तो ओमसाई प्रा.लि. कंपनीला दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ओम साई केअर ही कंपनी पूर्णपणे बदनाम झालेली कंपनी आहे, त्यांच्याबाबत मुंबई तसेच इतरत्र असंख्य तक्रारी दाखल आहेत तसेच त्यांच्या काही डॉक्टर्सवरती पैसे घेऊन प्रवेश दिल्याचे गुन्हे दाखल आहेत.
ठाणे महापालिकेने आरोप फेटाळले
अविनाश जाधव यांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून निविदा रीतसर पारदर्शक पद्धतीने राबविली असल्याचे ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. पहिल्या निविदाकाराने निविदा भरल्यानंतर त्यांनीच निविदा मागे घेऊन काम करण्यास नकार दिला. एका महिन्यात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य नाही असे ऑल इन सर्व्हिसेसने ठाणे महापालिकेला कळवले. तसे पत्रदेखील दिले आहे. त्यामुळे दुसऱ्या निविदाकाराला रीतसर हे काम दिले. विशेष म्हणजे दुसऱ्या निविदाकाराने निविदेत जे दर टाकले होते तेदेखील कमी केले आहेत. मुंबईत ऑक्सिजन, आयसीसीयू आणि ऑक्सिजन विरहित बेडसाठी ५० टक्के चार्जेस दिले जातात. ठाणे महापालिकेत यासाठी २५ टक्के चार्जेस दिले जात असल्याचे आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. वैजयंती देवगेकर यांनी सांगितले.