डोंबिवलीत रासायनिक जलप्रदूषण नियंत्रित करणारा बायोकल्चर प्लांट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:12+5:302021-06-18T04:28:12+5:30

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून ...

Commencement of Chemical Water Pollution Control Bioculture Plant at Dombivali | डोंबिवलीत रासायनिक जलप्रदूषण नियंत्रित करणारा बायोकल्चर प्लांट सुरू

डोंबिवलीत रासायनिक जलप्रदूषण नियंत्रित करणारा बायोकल्चर प्लांट सुरू

Next

कल्याण : डोंबिवलीतील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि अंबरनाथ कारखानदारी संघटना यांच्यातर्फे जलप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी बायो कल्चर प्लांट गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. बायोनेस्ट प्रक्रिया तत्त्वावर आधारित हा प्लांट आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रित होण्यास मदत होणार असल्याचा दावा कामा या कारखानदारी संघटनेने केला आहे.

या प्लांटची सुरुवात कामाचे अध्यक्ष देवेन सोनी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी यश फाउंडेशनचे अध्यक्ष केतन पटेल, उपाध्यक्ष यश पटेल, नरेंद्र पटेल, उदय वालावलकर, नारायण टेकाडे, राजू बेल्लोरे, कमल कपूर, चांगदेव कदम, मुरली अय्यर, राहुल कासलीवाल, निखिल धूत आदी उपस्थित होते. हा प्रकल्प बायोनेस्ट सिस्टीम या कंपनीचा आहे. सध्या या प्रकल्पाची क्षमता दहा हजार लीटर इतकी आहे. प्लांटचे तीन टाक्यांत वर्गीकरण करण्यात आले आहे. कारखान्यातून आलेले रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील एका उंचावरील टाकीत सोडण्यात येते. खाली बसविलेल्या तीन टाक्यांत ठिबक सिंचन पद्धतीने हे पाणी सोडल्यावर टाकीत लावलेल्या झाडांमुळे रासायनिक सांडपाण्यातील कार्बन डायऑक्साईड कमी होऊन पाणी स्वच्छ होते. या प्लांटच्या उभारणीकरिता १८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पातील गुंतवणूक ही एकदाच करावी लागते. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर अन्य १५० कंपन्यांमध्ये हा बायोकल्चरचा प्रयोग केला जाणार असल्याचे सोनी यांनी सांगितले.

प्लांटमधील दहा चौरस मीटरच्या टाक्यात पाचशे झाडे लावण्यात आली आहेत. त्यामध्ये काही औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. या प्रक्रियेत सूक्ष्मजीव सर्व प्रकारचे रसायन आणि रंगदेखील फस्त करतात. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी प्रदूषित पाणी बाहेर पडते. या प्लांटमध्ये सांडपाण्यातील रसायनावर जगणाऱ्या सूक्ष्मजीवांचा वापर करण्यात आला आहे. ही प्रक्रियाच संपूर्णपणे नैसर्गिक आहे. या प्लांटमध्ये कोणत्याही महागड्या खर्चिक यंत्रांचा वापर केलेला नाही. कमी खर्चात अधिक परिणामकारक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेची तांत्रिक बाजू औरंगाबादच्या यश फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे.

-------------------------

Web Title: Commencement of Chemical Water Pollution Control Bioculture Plant at Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.