कचोरेमध्ये कुष्ठरुग्णांच्या रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:36 AM2021-01-22T04:36:21+5:302021-01-22T04:36:21+5:30

कल्याण : कचोरे परिसरातील हनुमाननगर येथे कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय उभारण्याचे काम केडीएमसीकडून सुरू झाले आहे. गुढीपाडव्याला या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे ...

Commencement of leprosy hospital work in Kachore | कचोरेमध्ये कुष्ठरुग्णांच्या रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ

कचोरेमध्ये कुष्ठरुग्णांच्या रुग्णालयाच्या कामाला प्रारंभ

Next

कल्याण : कचोरे परिसरातील हनुमाननगर येथे कुष्ठरुग्णांसाठी रुग्णालय उभारण्याचे काम केडीएमसीकडून सुरू झाले आहे. गुढीपाडव्याला या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असून, हे कुष्ठपीडितांचे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरणार आहे.

१९९९ ला या वसाहतीत ३०० कुष्ठरुग्ण होते. संभाव्य धोका पाहता तेव्हापासूनच कुष्ठरुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, अशी मागणी कुष्ठरुग्ण मित्र गजानन माने यांनी केडीएमसीकडे केली होती. सततच्या पाठपुराव्यानंतर २०१४-१५ मध्ये महापौर कल्याणी पाटील आणि नगरसेवक कैलास शिंदे यांच्या प्रयत्नाने मनपाच्या अर्थसंकल्पात रुग्णालयाच्या उभारणीसाठी ५० लाखांची तरतूदही करण्यात आली. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती.

जमीनमालक विनोद प्रजापती यांनी त्यांची जमीन हनुमान कुष्ठ सेवा संस्थेला दान स्वरूपात दिली. यानंतर रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला. माजी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात रुग्णालयाचा आराखडा तयार झाला. परंतु, याला मूर्त स्वरूप विद्यमान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि शहरअभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांच्यामुळे मिळाले आहे. ३० जानेवारी २०२० ला माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेविका रेखा चौधरी, राजन चौधरी आणि महाराष्ट्र कुष्ठपीडित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले होते. परंतु, कोरोनामुळे फटका बसला. अखेर नोव्हेंबरमध्ये या कामाला सुरुवात झाली. गुढीपाडव्याच्या आतमध्ये हे काम पूर्ण करून रुग्णालय कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे.

१४ खाटांचे रुग्णालय

रुग्णालयाच्या बांधकामाच्या पायाबांधणीचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच तळमजला व पहिल्या मजल्याच्या कामाला सुरुवात होईल. या रुग्णालयात पुरुष आणि महिला रुग्णांसाठी प्रत्येकी सात अशा एकूण १४ खाटा असणार आहेत, अशी माहिती हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी दिली.

‘त्या’ दवाखान्याचीही दुरुस्ती

केडीएमसीने येथे १९९३ मध्ये दवाखाना उभारला होता. देखभाल दुरुस्तीअभावी जीर्ण झालेल्या दवाखान्याची पडझड झाल्याने फेब्रुवारी २०१९ पासून हा दवाखाना शेजारील राजगुरू विद्यालयाच्या सभागृहात हलविला आहे. मात्र, पडझड झालेल्या दवाखान्याची दुरुस्ती केडीएमसीकडून करण्यात आली असून ३० जानेवारीला आयुक्त आणि शहर अभियंता हे दोघेही हनुमाननगरला भेट देऊन दवाखाना आणि रुग्णालयाच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती गजानन माने यांनी दिली.

फोटो आहे.

----------------------------

Web Title: Commencement of leprosy hospital work in Kachore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.