शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदरमधील लसीकरण केंद्रांची संख्या घटली; पण लसींचा साठा मुबलक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:26 PM2021-10-05T15:26:32+5:302021-10-05T15:26:44+5:30
मीरारोड - शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदर महापालिकेची लसीकरण केंद्र संख्या ४० वरून १३ वर आली आहेत. परंतु, लसींचा ...
मीरारोड - शाळा सुरू झाल्याने मीरा भाईंदर महापालिकेची लसीकरण केंद्र संख्या ४० वरून १३ वर आली आहेत. परंतु, लसींचा साठा मुबलक असून लसीकरण केंद्रांवर आता लोकांची पहिल्या सारखी गर्दी उसळत नाही. ऑनलाईन नोंदणी सुरू केल्याने नागरिकांना आता नाहक केंद्रांवर ताटकळत राहावे लागणार नाही.
नगरसेवक - राजकारण्यांचा टोकन घोटाळा, हस्तक्षेप व वशिलेबाजीच्या आरोपांनी तसेच लसीकरण केंद्रावरील हाल, गैरसोय आदी कारणांनी मीरा भाईंदर महापालिकेची लसीकरण मोहीम वादग्रस्त ठरली. परंतु पालिकेच्या वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण मोहीम व्यापक प्रमाणात राबवली. त्या कर्मचाऱ्यांमुळे पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत ६ लाख ४५ हजार इतके लसीकरण झाले आहे. तर खाजगी रुग्णालयातून १ लाख २० हजार इतके डोस नागरिकांना दिले गेले आहेत.
शहरात महापालिकेची ४० लसीकरण केंद्र सुरू होरी. पण शाळा सुरू झाल्याने आता लसीकरण केंद्रांची संख्या १० ते १५ दरम्यान केली गेली आहे. परंतु लस पुरवठा सर्वत्र होत असल्याने आणि बहुतांश नागरिकांनी लस घेतली असल्याने केंद्रांवर होणारी गर्दी कमी झाली आहे. पालिका केंद्रात लस शिल्लक राहू लागली आहे. त्यामुळे केंद्र संख्या कमी झाली तरी त्याचा लोकांना त्रास होणार नसून, उलट पालिका यंत्रणेवर पडणारा ताण कमी झाला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लसीकरण प्रमुख डॉ. अंजली पाटील म्हणाल्या, पालिकेने आता लसीकरणासाठी ऑफलाइनसह पुन्हा ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करून ठराविक वेळेत केंद्रांवर पोहचता येईल. शाळा सुरू झाल्याने ४० पैकी जवळपास १३ केंद्र मंगळवारी सुरू आहेत. पण नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या आहेत. लसींचा साठा पुरेसा आहे.