आयुक्त, सेना, राष्ट्रवादीचा धोबीपछाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:00 AM2018-02-22T01:00:59+5:302018-02-22T01:01:03+5:30
भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर चर्चा घडवून आणायची नाही आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची खंबीरपणे पाठराखण करायची ही भूमिका निश्चित करण्याकरिता
ठाणे : भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी मांडलेल्या सभा तहकुबीवर चर्चा घडवून आणायची नाही आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांची खंबीरपणे पाठराखण करायची ही भूमिका निश्चित करण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत खलबते करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्या बैठकीत ठरल्यानुसार मुंब्रा येथील स्टेडियमच्या विषयावरुन वाद उकरून काढण्यात आला व भाजपाचा डाव फसला.
भाजपाचे गटनेते पाटणकर यांनी प्रशासनाविरोधात मांडलेल्या भल्या मोठ्या सभा तहकुबीवर चर्चा होणार हे स्पष्ट दिसत होते आणि पाटणकर यांच्या बाजूने किती नगरसेवक बोलतील, याचा अभ्यास दोन दिवस अगोदर सुरू होता. या सभा तहकुबीवर चर्चा झाली तर प्रशासन अडचणीत येऊ शकते, असा कयास लावला जात होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या तहकुबीवर चर्चा होऊ द्यायची नाही आणि महासभा सात वाजेपर्यंत रेटून नेण्याचे प्लॅनिंग सोमवारी रात्री झाले.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेला सेनेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. आयुक्तांविरोधात आवाज उठवणाºया महापौर मीनाक्षी शिंदे यांना यावेळी ‘कानमंत्र’ देण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली.
आयुक्तांशी पालकमंत्र्यानी काही चर्चा केली. त्यांना आश्वासन देण्यात आले. पालिकेच्या महासभेची वेळ साडेअकराची असली तरी बहुतांश वेळा ती दुपारी १ वाजेपर्यंत सुरु होते. मंगळवारी महासभा वेळेत सुरू झाली. काही सदस्यांना महासभा नेहमीप्रमाणे उशिरा सुरु होईल, असे वाटत असल्याने ते उशिरा आले. साहजिकच शिवसेनेचे सदस्य ठरल्यानुसार वेळेवर हजर होते. शिवसेनेची पहिली खेळी यशस्वी झाली. गणसंख्येअभावी सभा तहकूब झाली. एकदा सभा तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभा तहकुबी मांडून चर्चा शक्य नव्हती. पुन्हा महासभा सुरू होताच पाटणकर यांनी सभा तहकुबी रेटण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबवण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला राष्टÑवादी धावून आली. मुंब्य्रातील स्टेडिअमचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सभा लांबवली. याच गोंधळात विषयपत्रिका पुकारुन पाटणकर यांच्या तहकुबीला तिलांजली दिली.