वृक्ष प्राधिकरणची बैठक आयुक्तच घेणार
By admin | Published: January 6, 2017 06:10 AM2017-01-06T06:10:40+5:302017-01-06T06:10:40+5:30
वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वृक्ष प्राधिकरण अधिनियमानुसार चालवण्यात यावी, असे महत्त्वपूर्ण पत्र महाराष्ट्र शासनाने ठाणे महापालिकेला पाठवले आहे
ठाणे : वृक्ष प्राधिकरण समितीची सभा वृक्ष प्राधिकरण अधिनियमानुसार चालवण्यात यावी, असे महत्त्वपूर्ण पत्र महाराष्ट्र शासनाने ठाणे महापालिकेला पाठवले आहे. त्यामुळे आता यापुढील सर्व बैठका आयुक्त घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांनी अशा बैठका घेऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तांमार्फत घेण्यात येत असलेल्या बैठकीबाबत आमदार प्रताप सरनाईक यांच्या तक्रारीची दखल घेऊन राज्य शासनाने पत्र पालिकेला पाठवले आहे.
आयुक्तांच्या गैरहजेरीत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सरसकट वृक्षतोडीला परवानगी अतिरिक्त आयुक्तांकडून दिली जात असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला होता. त्यामागे ते आणि अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्यातील संघर्षाचीदेखील पार्श्वभूमी होती.
बुधवारच्या बैठकीतदेखील गोषवारा मिळाला नसल्याचे कारण पुढे केले असले तरी शिवसेनेच्या दबावानंतरच सेनेच्या सदस्यांनी ती तहकूब केली होती. दरम्यान, यासंदर्भात सरनाईक यांनी राज्य शासनाकडे पत्र पाठवून या सर्व प्रकरणांची दखल घेऊन या बैठकीला स्थगिती देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्याची तत्काळ दखल घेऊन राज्य शासनाने बुधवारी होणाऱ्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीला स्थगिती देऊन अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती हे पद पदसिद्ध असून कलमान्वये प्राप्त अधिकार आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना प्रदान करण्याची तरतूद महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मध्ये नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)